नाशिक : मनपा नोकरभरती, पदोन्नती वादात सापडण्याची शक्यता

नाशिक मनपा www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

नोकरभरती आणि पदोन्नतीसाठी महापालिकेने तयार केलेल्या सेवा प्रवेश नियमावलीमध्ये शासनाच्याच आदेशांचा भंग केल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे महापालिकेने एकप्रकारे शासनाची फसवणूक करत भरती आणि पदोन्नती या दोन्ही प्रक्रिया योग्य नियमावलीच्या आधारे न झाल्याने महापालिकेची यापूर्वीची नियमावली वादात सापडून त्याआधारे झालेली भरती आणि पदोन्नतीही वादात सापडण्याची शक्यता आहे.

मुंबई प्रांतिक महापालिका अधिनियम १९४९ च्या कलम ४५७ (३) नुसार रिक्त जागांवर नेमणूक करण्याचा अधिकार आणि संबंधित जागांसाठी आवश्यक असलेली अर्हता व त्या जागांवर नेमणूक करण्याची पद्धती याबाबत नियम करणे आवश्यक असते. त्यानुसार २ जुलै २००८ मध्ये नगरसचिव खात्याचे तत्कालीन सचिव व विद्यमान मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांनी नियमावली तयार करून त्याप्रमाणे अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले होते. या आदेशानंतर आजही अनेक महापालिकांनी सेवा प्रवेश नियम तयार केलेले नाहीत. काही महापालिकांमध्ये सेवा प्रवेश नियम अंशत: मंजूर आहेत. तसेच महापालिकांमध्ये कर्मचारी, अधिकाऱ्यांच्या सेवा प्रवेश नियमांबाबत न्यायालयीन दाव्यात न्यायालयाकडून वारंवार विचारणा होत आहे. विधी मंडळ समित्यांनीही सेवा प्रवेश नियम लवकरात लवकर करण्याबाबत अनेकदा शिफारस केली आहे. असे असताना बऱ्याच महापालिकांनी त्याकडे दुर्लक्ष केले आहे. या पार्श्वभूमीवर शासनाच्या नगरविकास विभागाने २००८ मध्ये मनपाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची नमूना सेवा प्रवेश नियमावली तयार करण्याची तसेच नियम तयार करण्यासंदर्भात कालबद्ध कार्यक्रम आखून त्याचे पालन करण्याचे निर्देश तत्कालीन सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांनी सर्वच महापालिका आयुक्तांना दिले होते.

शासन आदेशानुसार मनपातील कर्मचारी व अधिकाऱ्यांची मॉडेल सेवा प्रवेश नियम शासनाने तयार केले होते. त्या आधारे प्रत्येक महापालिकेने त्यांचे सेवा प्रवेश नियम तयार करण्याच्या दृष्टीने महापालिका अधिनियमाच्या कलम ४५६ (१) अन्वये सेवा प्रवेश नियम तयार करण्यासंबंधी कालबद्ध कार्यवाही करण्याची सूचना केली होती. परंतु, अशा प्रकारे शासन आदेशांचे पालन न झाल्यानेच नाशिक महापालिकेच्या सेवा प्रवेश नियमावली अनेक त्रुटी आढळून येत आहेत. आणि त्यामुळेच २०१७ मध्ये सादर केलेल्या नियमावलीला वारंवार ब्रेक लागत आहे.

असा आहे कालबद्ध कार्यक्रम
नियमावली तयार करण्याच्या कालबद्ध कार्यक्रमानुसार सेवा प्रवेश नियम (प्रारूप) तयार करण्यासाठी एक महिना, सेवा प्रवेश नियमासंदर्भात ठराव पारीत करणे यासाठी दोन आठवडे, प्रारूप सेवा प्रवेश नियम राजपत्रात प्रसिद्ध करण्याकरिता एक आठवडा, हरकती सूचनांसाठी दोन महिन्यांचा कालावधी, तर प्राप्त हरकती, सूचना मागवून त्यांचे निराकरण करून शासन मान्यतेसाठी प्रस्ताव पाठविणे याकरिता दोन आठवड्यांचा कालावधी असा कार्यक्रमच शासनाने आखून दिला आहे. परंतु, नाशिक महापालिकेने याआधी नियमावली तयार करताना अशा कोणत्याही प्रकारच्या निर्देशांचे पालन केलेले नसल्याची बाब समोर आली आहे.

प्रशासनाने २०१७ मध्ये अशा प्रकारची नियमावली शासनाकडे सादर केली होती. परंतु, ती नियमावली प्रसिद्ध केली होती की नाही हे सांगता येणार नाही. २००८ मध्ये दिलेल्या निर्देशांनुसार नियमावली करताना कालबद्ध कार्यक्रम राबवला होता की नाही याबाबतही माहिती नाही.

– मनोज घोडे पाटील, उपायु्क्त प्रशासन

हेही वाचा :

The post नाशिक : मनपा नोकरभरती, पदोन्नती वादात सापडण्याची शक्यता appeared first on पुढारी.