नाशिक : मनपा शाळांमधील स्वच्छतागृहांची होणार अचानक तपासणी

शाळा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

शाळा व शाळेचा परिसर आरोग्यदायी रहावा तसेच विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने शाळेची स्वच्छता तसेच शाळेतील स्वच्छतागृहांची नियमित साफसफाई करण्याचे निर्देश मनपा शिक्षण विभागाने पत्राव्दारे मनपाच्या सर्व मुख्याध्यापकांना दिले आहेत. स्वच्छतेसाठी लागणारा खर्च शाळांना दरवर्षी मिळणाऱ्या शाळा अनुदानातून करण्याची सूचना करण्यात आली असून, स्वच्छतेबाबत हलगर्जीपणा करणाऱ्यांवर कारवाईचा इशारा मनपा शिक्षण विभागाने दिला आहे.

महापालिका व जिल्हा परिषद या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या तसेच शासन अनुदानीत खासगी शाळांना शासनाकडून समग्र शिक्षाअंतर्गत दरवर्षी संयुक्त शाळा अनुदान उपलब्ध करून दिले जाते. या अनुदानातून संबंधीत अनुदान पात्र शाळांनी खर्च करावयाचा आहे. त्यानुसार शाळा इमारत व स्वच्छतागृहांची देखभाल व दुरूस्ती, वैयक्तीक स्वच्छतेसाठी लागणारी आवश्यक सामग्री (साबण, सॅनिटायझर्स), इंटरनेट जोडणी व देयके, संगणक साहित्य व उपकरणे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था व देखभाल, स्टेशनरी व इतर रजिस्टर्सची खरेदी, अग्निप्रतिबंधक यंत्राची पुनर्भरणी, प्रथमोपचार पेटी, वीज बिल अशा विविध बाबींवर खर्च करण्यात येतो. परंतु, त्यात शाळा व शाळेतील स्वच्छतागृहांची स्वच्छता यास प्राधान्य देण्याची सूचना पत्राव्दारे मनपा शिक्षण विभागाच्या प्रशासनाधिकारी सुनीता धनगर यांनी केली आहे.

सर्व शाळांनी शाळेतील स्वच्छतागृहांमधील स्वच्छता आणि स्वच्छतेच्या समस्येवर परिणामकारकरित्या लक्ष ठेवण्यासाठी शालेय स्वच्छता हा विषय पालक शिक्षक संघाच्या मासिक सभेत समविष्ट करण्याची सूचना करण्यात आली आहे. शाळा अनुदानातून शाळा इमारत व स्वच्छतागृहांची देखभाल दुरूस्ती तसेच वैयक्तीक स्वच्छतेसाठी लागणारी सामग्रीचा समावेश होत असल्याने त्यासाठी अनुदानाचा उपयोग करण्यात यावा, असे प्रशासनाधिकारी धनगर यांनी स्पष्ट केले आहे.

पटसंख्येनुसार मिळणारे शाळा अनुदान

महापालिकेच्या एकूण ८८ प्राथमिक तर १२ माध्यमिक शाळा आहेत. शाळांना दरवर्षी शाळा अनुदान दिले जाते. ० ते ३० पटसंख्या असलेल्या शाळांना प्रत्येकी पाच हजार, ३१ ते १०० पटसंख्येच्या शाळांना १२ हजार ५००, १०१ ते २५० पटसंख्येच्या शाळांना प्रत्येकी २५ हजार, २५१ ते १ हजार पटसंख्येच्या शाळांना ३७ हजार ५०० तर १ हजारच्या वर पटसंख्या असलेल्या शाळांना प्रत्येकी ५० हजार रूपये अनुदान दिले जाते.

हेही वाचा :

The post नाशिक : मनपा शाळांमधील स्वच्छतागृहांची होणार अचानक तपासणी appeared first on पुढारी.