नाशिक : मनमाडला कांदा लिलाव बंद पाडून रास्ता रोको

मनमाड रास्ता रोको,www.pudhari.news

मनमाड (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा

कांद्याच्या भावात सुरू असलेली घसरण थांबता थांबेना. त्यामुळे शेतकरी संकटात सापडला असून, कांद्यावरील निर्यात बंदी उठवून योग्य भाव देण्याच्या मागणीसाठी उद्धव ठाकरे शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससह महाविकास आघाडीच्या इतर पक्षांनी आक्रमक भूमिका घेऊन शुक्रवारी (दि.१७) बाजार समितीत लिलाव बंद पाडल्यानंतर नाशिक-औरंगाबाद मार्गावर रास्ता रोको आंदोलन केले.

माजी आमदार संजय पवार यांच्यासह गणेश धात्रक, शिवसेना शहरप्रमुख माधव शेलार, राष्ट्रवादी काॅंग्रेस शहराध्यक्ष दीपक गोगड, काॅंग्रेसचे नाजीम शेख, माजी नगराध्यक्ष प्रवीण नाईक यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यावेळी संतप्त शेतकरी आणि कार्यकर्त्यांनी केंद्र आणि राज्य सरकार विरुद्ध जोरदार घोषणाबाजी करत कांद्याला प्रतिक्विंटल तीन हजार रुपये भाव किंवा १,५०० रुपये अनुदान देण्याची मागणी केली. आंदोलनामुळे महामार्गवरील वाहतूक ठप्प झाली होती. गेल्या एक ते दीड महिन्यापासून मनमाडसह नाशिक जिल्ह्यातील जवळपास सर्वच बाजार समित्यांमध्ये कांद्याच्या भावात मोठी घसरण होत आहे. रोज भाव कोसळत असून, आता तर कांद्याला प्रतिक्विंटल कमीत कमी ३०० रुपये तर सरासरी ६०० ते ७०० रुपये भाव मिळत आहे. कष्टाने पिकविलेल्या कांद्याला कवडीमोल भाव मिळत असल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.

शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी महाविकास आघाडी रस्त्यावर उतरली. त्यांनी बाजार समितीसमोर नाशिक-औरंगाबाद मार्गावर रास्ता रोको आंदोलन केले. सुमारे एक तास चाललेल्या या आंदोलनामुळे चौफुलीवर वाहनांच्या रांगा लागून वाहतूक ठप्प झाली होती. आंदोलनात ठाकरे गट शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख संतोष बळीद, काॅंग्रेसचे भीमराव जेजुरे यांच्यासह लियाकत शेख, बाळासाहेब साळुंके, संतोष जगताप, प्रमोद पाचोरकर, बी. डी. कातकडे, विजय मिश्रा, संजय कटारिया, अशोक पवार, अक्षय देशमुख, इरफान शेख आदी महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शेतकरी सहभागी झाले होते.य

हेही वाचा : 

The post नाशिक : मनमाडला कांदा लिलाव बंद पाडून रास्ता रोको appeared first on पुढारी.