नाशिक : मनमाड, येवलाकरांना दिलासा करंजवण धरणातून पिण्याचे आवर्तन सुटले

दिंडोरी; पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील प्रत्येक वर्षी कडक उन्हाळ्यात येवला, मनमाडकरांची तहान भागवण्या करंजवन धरणातून दोन महिन्याच्या प्रतिक्षेनंतर २७ मे रोजी सकाळी ७ वाजता धरणातून १४०० क्युसेक्सने कादवा नदीत पाणी सोडण्यात आले.  पुढे पालखेंड धरणातून मनमाड, येवला शहराना पिण्यासाठी पाणी सोडण्यात येणार असल्याची माहिती करंजवण धरण शाखा अभियंता शुंभम भालके यांनी दिली.

गेल्या दोन महिन्यात फक्त एकदा महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्या पत्राद्वारे स्थानिक ओझे, करंजवण, म्हेळूस्के, लखमापूर येथील गावाना पिण्याच्या पाण्यासाठी पाणी कादवा नदी पात्रात सोडण्यात आले होते. त्यामुळे स्थानिक कादवा नदी पात्राच्या कडेला असणा-या पाणीपुरवठा योजनांना दिलासा मिळाल्यामुळे चालू वर्षी पाणी टंचाई निर्माण झालेली नाही. मात्र गेल्या पाच ते सहा दिवसांपासून कादवा नदीचे पात्र ठीक ठिकाणी कोरडे पडल्यामुळे नदीतील जलचर प्राण्यांचे मोठ्या प्रमाणावर हाल झालेले दिसून आले. त्यात मनमाड शहराला पाणीपुरवठा करणा-या वागदर्डी धरणातील पाणीसाठा संपुष्टात येत असल्यामुळे व पालखेंड धरणातील पाणीसाठा १५% एवढाच असल्यामुळे पालखेंड मधून मनमाडसाठी पाणी सोडता येत नव्हते.

मनमाड व येवला शहराना पाणी सोडण्यासाठी अगोदर पालखेंड धरणात पाणीसाठा करून मनमाडला पाणी सोडवे लागते. त्यामुळे अगोदर करंजवण धरणातून पालखेंड धरणात पाणी सोडले जाते. वागदर्डी व साठवण तलावातील उपलब्ध पाणीसाठा लक्षात घेता मनमाड पालिका प्रशासनाने शहरासाठी महिन्यातून एकदा पाणी सोडण्याचा निर्णय घेतल्यामुळे मनमाडकरांवर हंडाभर पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे. त्यात २० लिटर पाण्याचा जार ३० रुपयाना मिळत असल्याने त्याची किंमत १०० ते २०० रुपयापर्यंत पोहचल्याचे बोलले जात होते. मात्र आता करंजवण धरणातून खास मनमाड व येवला शहरासाठी पाणी सोडण्यात आले असून लवकरच पालखेंड धरणातून पाणी सोडण्यात येणार आहे. त्यामुळे मनमाड वासियांना येत्या काही दिवसात पिण्याच्या पाण्याचा दिलासा मिळणार आहे. त्याच प्रमाणे करंजवण धरणातून मनमाड शहरासाठी मजुर झालेल्या पाणी पुरवठा योजनेचे काम युद्धपातळीवर चालू असल्यामुळे मनमाड शहराला मोठा दिलासा मिळणार आहे.

दिंडोरी तालुक्यातील धरणाचा पाणीसाठा

करंजवण धरण 27 %
पालखेड धरण 15%
पुणेगाव धरण 16%
ओझरखेंड धरण 16%
वाघाड धरण 7%
तिसगाव धरण 7% फोटो –

The post नाशिक : मनमाड, येवलाकरांना दिलासा करंजवण धरणातून पिण्याचे आवर्तन सुटले appeared first on पुढारी.