नाशिक : ‘मविप्र’चा आज फैसला ; 56 उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद

मविप्र निवडणूक,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून असलेल्या मराठा विद्या प्रसारक समाज संस्था अर्थात मविप्र पंचवार्षिक निवडणुकीसाठी रविवारी (दि.28) मतदान प्रक्रिया पार पडली. या निवडणुकीसाठी 95 टक्के मतदान झाले आहे. 24 जागांसाठी 56 उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले आहे. सोमवारी (दि.29) मतमोजणीची प्रक्रिया होणार असून, त्यानंतर ‘मविप्र’च्या पुढील पाच वर्षांच्या कारभार्‍यांवर शिक्कामोर्तब होणार आहे.

सन 2017 च्या मविप्र पंचवार्षिक निवडणुकीत सरचिटणीसपदाचा निकाल सर्वांत शेवटी म्हणजे रात्री 11.30 वाजता जाहीर झाला होता. यंदा अंतिम निकाल सोमवारी (दि. 29) 9 च्या आत जाहीर करण्याच्या दृष्टीने निवडणूक मंडळाने नियोजन केले आहे. मराठा हायस्कूलच्या प्रांगणातील कै. तुकाराम रौदळ सभागृहात 24 टेबलांवर एकाच वेळी मतमोजणी होणार आहे. फेरमोजणीचा अर्ज दाखल झाल्यास अंतिम निकालासाठी मध्यरात्र होऊ नये, यासाठी यंदाच्या मतमोजणी प्रक्रियेत बदल करण्यात आला आहे.

मतदान प्रक्रियेला प्रारंभ झाल्यानंतर सर्वांत प्रथम तालुक्यातील सर्व मतपेट्यांमधील मतपत्रिका एकत्रित केल्या जातील. सील केलेल्या मतपेट्या या निरीक्षकांना दाखवून त्यांचे समाधान झाल्यानंतर मतपेटी उघडली जाईल. एकत्रित झालेल्या मतपत्रिकांमधून रंगनिहाय मतपत्रिका वेगळ्या केल्या जातील. या प्रक्रियेला साधारणतः दुपारचे दोन वाजतील. त्यानंतर प्रत्यक्ष मतमोजणीला प्रारंभ होणार आहे. दरम्यान, यंदाच्या मविप्र निवडणुकीत उपाध्यक्षपदासह दोन महिला संचालकांच्या रूपाने तीन जागा वाढल्या आहेत. त्यामुळे मतमोजणी करणार्‍या कर्मचार्‍यांची संख्याही वाढवण्यात आली आहे. सर्व पदांची मतमोजणी एकाचवेळी सुरू होणार असली तरी, सेवक संचालकपदाचे मतदान सर्वांत कमी असल्याने त्यांचा निकाल आधी जाहीर होईल. तर सर्वांत शेवटी महिला संचालक पदाचा निकाल लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

समर्थकांमध्ये किरकोळ बाचाबाची :

मविप्र निवडणुकीत तीन सेवक संचालक पदासाठी ‘सेवक’ पॅनल व ‘समर्थ’ पॅनलमध्ये सामना होत आहे. केटीएचएम महाविद्यालयामध्ये सेवक मतदान केंद्रावर उमेदवारांव्यतिरिक्त त्यांचे समर्थक थांबल्याने दोन्ही बाजूचे उमेदवार व समर्थकांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली होती. त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. अखेर पोलिसांनी मध्यस्थी केल्यानंतर वादावर पडदा पडला.

लक्ष्मी अन् देवदर्शनाची चर्चा :

प्रगती व परिवर्तन या दोन्ही पॅनलसाठी यंदाची निवडणूक प्रतिष्ठेची आहे. त्यामुळे दोन्ही पॅनलकडून जोरदार मोर्चेबांधणी करण्यात आली होती. या निवडणुकीत मातब्बरांकडून साम-दाम-दंड-भेद आदीचा वापर करण्यात आला. अनेक उमेदवारांनी निवडून येण्यासाठी मतदारांना लक्ष्मीदर्शनासह देवदर्शन घडविल्याची चर्चाच आहे.

गेल्या पाच वर्षांत सत्ताधार्‍यांनी चालवलेला एककलमी कारभारामुळे यंदाच्या मविप्र निवडणुकीत जिल्हाभर मतदानाचा टक्का ऐतिहासिक होता. सभासदांच्या मनात परिवर्तन ठरलेले होते. त्यामुळे मतदारांनी दाखवलेला उत्साह सर्वकाही सांगून गेला. परिवर्तन पॅनलचा विजय निश्चित आहे. मी सर्व सभासद, हितचिंतक, प्रचारक यांचे आभार मानतो.
– अ‍ॅड. नितीन ठाकरे (परिवर्तन पॅनल)

संस्थेच्या प्रगतीचा ध्यास बाळगत केलेले कामकाज निवडणुकीला सामोरे जाताना सभासदांपर्यंत पोहोचविले. संस्था चांगल्या हातात राहावी म्हणून समाजाच्या सर्व घटकांनी स्वतःची समजून निवडणूक हातात घेतली. सर्व स्तरावरून साथ व मदत मिळाल्याचा आनंद होतो आहे. ज्येष्ठ नेते श्रीराम शेटे यांची भक्कम साथ लाभल्याने आत्मविश्वास वाढला. निवडणुकीत विविध स्तरांवरून साथ देणार्‍या सर्वांचे मनापासून आभार.
– नीलिमा पवार (प्रगती पॅनल)

हेही वाचा :

The post नाशिक : ‘मविप्र’चा आज फैसला ; 56 उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद appeared first on पुढारी.