नाशिक : ‘मविप्र’ची गुणवत्ता टिकविणे समाजाचे कर्तव्य : खा. डॉ. भामरे

भामरे www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
मविप्र संस्था ही केवळ उत्तर महाराष्ट्राची नाही तर महाराष्ट्राचा मानबिंदू आहे. बोटावर मोजता येतील इतक्या संस्थांमध्ये गुणवत्तापूर्ण व पारदर्शक कारभार सुरू असून, त्यात मविप्रचे नाव आवर्जून घ्यावे लागेल. चांगल्या संस्था टिकवून ठेवणे व त्यासाठी गुणवत्तेचे लोक निवडून देणे हे समाजाचे कर्तव्य असल्याचे प्रतिपादन माजी केंद्रीय मंत्री तथा खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी केले.

सटाणा येथील राधाई मंगल कार्यालय येथे झालेल्या प्रगती पॅनलच्या प्रचार मेळाव्यात ते बोलत होते. व्यासपीठावर जिभाऊ सोनवणे, रामचंद्र पाटील, श्रीराम शेटे, नीलिमा पवार, यशवंत अहिरे, माणिकराव बोरस्ते, डॉ. सुनील ढिकले, शंकरराव कोल्हे-खेडेकर, राघोनाना अहिरे, नानाजी दळवी, डॉ. प्रशांत पाटील, डॉ. विलास बच्छाव, केदा आहेर, डॉ. जयंत पवार, दिलीप मोरे, धनंजय पवार, नाना महाले आदी उपस्थित होते. डॉ. वसंत पवार हे माझे गुरू होते. त्यांच्या सल्ल्याने आपण राजकारणात प्रवेश केला. त्यांची आज प्रकर्षाने आठवण येत असून, नीलिमाताईंचे कार्यदेखील समाजाप्रती बांधिलकीचे आहे. डॉ. पवार रुग्णालयाने उत्तर महाराष्ट्रातील जनतेची मनापासून सेवा केली. माफक दरात चाचण्या व अत्यल्प दरात कोरोना काळात उपचार केल्याचे खा. डॉ. भामरे यांनी सांगितले. तर मविप्र संस्थेने आज हजारो एकर जमिनीचा ठेवा जपला असून, तो सुरक्षित ठेवण्याचे कार्य संचालक मंडळाने केल्याचे श्रीराम शेटे यांनी सांगितले. प्रचार मेळाव्यात पॅनलच्या प्रमुख नेत्यांसह ज. ल. पाटील, शक्ती दळवी, विशाल सोनवणे, दिलीप मोरे, धर्मा कोर, अजित थोरात यांनी मनोगत व्यक्त केले. बुधवारी (दि.24) दिवसभरात कंधाने, वीरगाव, करंजाड, नीताणे, सोमपूर, पिंपळकोठे, द्याने, नामपूर, लखमापूर, ब—ाह्मणगाव येथील प्रचारसभांना सभासदांनी गर्दी केली होती.

‘केटीएचएम’ जमिनीबाबत अपप्रचार : नीलिमा पवार
विरोधकांकडे कार्यक्रम, मुद्देच नाहीत. त्यामुळे ते शंभर टक्के खोटा प्रचार करीत आहे. केटीएचएम महाविद्यालयाची जमीन कर्मवीर बाबूराव ठाकरे यांनी दिली हा विरोधकांचा अपप्रचार आहे. ही जमीन कर्मवीर काकासाहेब वाघ यांनी पत्नीचे दागिने गहान ठेवून शासनाकडून खरेदी केल्याचे प्रगती पॅनलच्या नेत्या नीलिमा पवार यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा:

The post नाशिक : ‘मविप्र’ची गुणवत्ता टिकविणे समाजाचे कर्तव्य : खा. डॉ. भामरे appeared first on पुढारी.