नाशिक : ’मविप्र’ची मैदाने मिळणार भाडेतत्त्वावर

मविप्र लोगो www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
राज्यातील दुसर्‍या क्रमांकाची सर्वांत मोठी शैक्षणिक संस्था म्हणून ओळख असलेल्या मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेने स्वामालकीची मैदाने, रनिंग ट्रॅक व हॉल भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय घेतला आहे. या माध्यमातून संस्थेच्या उत्पन्नात भर पडेल, असा विश्वास विद्यमान कार्यकारी मंडळाकडून व्यक्त करण्यात आला आहे. त्यासाठी शहरासह ग्रामीण भागातील तब्बल डझनभर शाळा-महाविद्यालयांची निश्चिती करण्यात आली आहे. त्यामुळे भविष्यात या मैदानांवर मोठ्या स्पर्धा बघण्याची संधीही नाशिककरांना मिळणार आहे.

मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या शाळा-महाविद्यालयांत असलेली खेळाची मैदाने, टर्फ, बॅडमिंटन हॉल, बास्केटबॉल कोर्ट, रनिंग ट्रॅक, रोल बॉल स्केटिंग, बॉक्सिंग, तायक्वांदो आदी लहान मुलांच्या सुदृढतेसाठी शिबिरे किंवा महाविद्यालयीन व्यावसायिक प्रशिक्षणासाठी खुली मैदाने ही क्रीडा, शारीरिक व इतर शिक्षण उपक्रमांसाठी विविध अंतरांची मैदाने करारनामा किंवा भाडेतत्त्वावर दिली जाणार आहे. वास्तविक, यापूर्वीही काही मैदान व हॉल भाडेतत्त्वावर ‘मविप्र’कडून दिली जाते. त्यांच्या भाडे रकमेतही वाढ करण्याचा निर्णय विद्यमान कार्यकारिणीने घेतला आहे. दरम्यान, नाशिक शहरातील कर्मवीर बाबूराव ठाकरे अभियांत्रिकी महाविद्यालय, सीएमसीएस महाविद्यालय, केटीएचएम महाविद्यालय, होरायझन अकॅडमी, मराठा हायस्कूल, वाघ गुरुजी कॅम्पस, सिडको-वावरे महाविद्यालयातील मैदाने व हॉल भाडेतत्त्वावर उपलब्ध होणार आहे. तर ग्रामीण भागात सिन्नरचे जीएमडी महाविद्यालय व जनता विद्यालय (नायगाव), नांदगावचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, पिंपळगाव बसंवतचे कर्मवीर काकासाहेब वाघ महाविद्यालय, सटाण्याचे कर्मवीर आबासाहेब सोनवणे महाविद्यालयाची मैदाने व हॉल भाडेतत्त्वावर मिळणार आहेत.

मविप्र संस्थेच्या उत्पन्नवाढीसाठी स्वमालकीची मैदाने व हॉल भाडेतत्त्वावर दिले जातात. यापूर्वीच्या भाडे आकारणीत दरवाढ केली जाईल. मैदाने अथवा हॉल भाडेतत्त्वावर देण्यापूर्वी ओपन टेंडरच्या माध्यमातून करारनामा होईल. शाळा-महाविद्यालयाच्या वेळा सोडून संबंधित मैदाने अथवा हॉल उपलब्ध असतील. – नितीन ठाकरे, सरचिटणीस (मविप्र संस्था).

हेही वाचा:

The post नाशिक : ’मविप्र’ची मैदाने मिळणार भाडेतत्त्वावर appeared first on पुढारी.