नाशिक : मविप्रच्या सुरक्षिततेसाठी सक्षम कारभारी गरजेचे : आ. डॉ. राहुल आहेर

मविप्र www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

भक्कम पायाभरणी असलेल्या मविप्र संस्थेला बाह्यशक्ती धक्का देण्याच्या तयारीत असून, संस्था सुरक्षित ठेवण्यासाठी सक्षम कारभारी असणे गरजेचे आहे. अडचणीच्या काळात नीलिमा पवार यांनी संस्था सांभाळली व नावारूपाला आणली. त्यामुळे संस्थचे हित डोळ्यासमोर ठेवून प्रगती पॅनलला एकमताने निवडून द्या, असे आवाहन आमदार डॉ. राहुल आहेर यांनी केले.

चांदवड तालुक्यातील वडनेरभैरव येथे प्रगती पॅनलच्या प्रचार सभेत ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रामकृष्ण पवार होते. व्यासपीठावर ज्येष्ठ नेते श्रीराम शेटे, रामचंद्रबापू पाटील, नीलिमा पवार, यशवंत आहिरे, मनोहर देवरे, डॉ. सुनील ढिकले, उत्तम भालेराव, केदा आहेर, शंकरराव कोल्हे-खेडेकर, सुरेश निकम, सुरेश कळमकर, शिवाजी बस्ते, दिलीप मोरे, बाबाजी सलादे, मनोज शिंदे, दीपक पाचोरकर, डॉ. धीरज भालेराव, डॉ. विलास बच्छाव, सचिन पिंगळे, डॉ. प्रशांत पाटील आदी उपस्थित होते. कर्मवीरांनी दर्‍याखोर्‍यात शिक्षणाची गंगा पोहोचावी म्हणून संस्थेची उभारणी केली. डॉ. वसंत पवारांनी व्यावसायिक शिक्षणाचे कोर्सेस आणून संस्थेला आर्थिक स्थैर्य मिळवून दिले. समाजाच्या संस्थेत राजकारण न आणता ती टिकविणे आवश्यक असल्याचे ज्येष्ठ नेते श्रीराम शेटे यांनी सांगितले. तर विरोधकांनी पुराव्याशिवाय आरोप करून संस्थेची प्रतिमा समाजात मलीन करू नये, असा सल्ला नीलिमा पवार यांनी दिला.

ग्रामीण भागात प्रचार : वीकेण्डची संधी साधत प्रगती पॅनलने चांदवड, येवला, नांदगाव तालुका पिंजून काढत प्रचाराची राळ उडवून दिली. दिवसभरात धोडांबे, येवला व नांदगाव येथे प्रचारसभा झाल्या. या सभांना सभासदांनी मोठी गर्दी केली होती. मेळाव्यांमधून नेत्यांनी पॅनलची भूमिका सभासदांसमोर मांडली.

हेही वाचा:

The post नाशिक : मविप्रच्या सुरक्षिततेसाठी सक्षम कारभारी गरजेचे : आ. डॉ. राहुल आहेर appeared first on पुढारी.