नाशिक : ‘मविप्र’ला मिळाले नवीन शिक्षणाधिकारी

मविप्र निवडणूक,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

राज्यातील दुसऱ्या क्रमांकाची शिक्षण संस्था म्हणून ओळख असलेल्या मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेत तब्बल 20 वर्षांनंतर सत्तांतर झाले आहे. नवीन कार्यकारी मंडळाने आधीच्या कार्यकारी मंडळाच्या निर्णयात बदल करण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून नवीन कार्यकारिणीने प्राथमिक विभागाचे संजय शिंदे वगळता, इतर शिक्षणाधिकाऱ्यांना हटवून नवीन शिक्षणाधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे.

मविप्र संस्थेच्या नवीन कार्यकारी मंडळाच्या बैठकीत विविध मुद्द्यांवर शिक्षणाधिकारी तथा सेवक संचालक व कार्यकारिणी सदस्यांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. वेतनवाढ स्थगितीच्या निर्णयाला शिक्षणाधिकारी व सेवक संचालकांनी विरोध दर्शविल्याने कार्यकारिणी संचालक चांगलेच आक्रमक झाले होते. परिणामी, कार्यकारिणीने विद्यमान शिक्षणाधिकाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखविण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार डॉ. डी. डी. काजळे, डॉ. एस. जे. कोकाटे आदींना शिक्षणाधिकारीपदावरून दूर करण्यात आले, तर यानिमित्ताने प्रा. डॉ. अशोक पिंगळे यांचे संस्थेत पुनरागमन झाले आहे. दरम्यान, माजी कार्यकारिणी मंडळाने पंचवार्षिक निवडणुका डोळ्यासमाेर ठेवून नवीन कर्मचाऱ्यांना नियुक्त्या दिल्या होत्या. काहींना लेखी, तर काहींना तोंडीच रुजू करून घेण्यात आले होते. या नवीन कर्मचारी नियुक्त्यांसंदर्भात चौकशी करून कारवाईचा निर्णय विद्यमान कार्यकारिणीने घेतला. त्यामुळे संबंधित नव्याने रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार आहे.

नूतन शिक्षणाधिकारी असे…

प्राथमिक विभाग : सी. डी. शिंदे, माध्यमिक विभाग : प्रा. डॉ. भास्कर ठोके, महाविद्यालय विभाग : प्रा. डॉ. नितीन जाधव, वैद्यकीय विभाग : प्राचार्य डॉ. आर. डी. दरेकर, इंजिनिअरिंग विभाग : प्रा. डॉ. डी. डी. लोखंडे, एमआयआरटी विभाग : प्राचार्य डॉ. विलास देशमुख, होरायझन इंग्लिश मीडियम : संजय पाटील, सर्वसामान्य प्रशासन विभाग : प्रा. डॉ. अजित मोरे, प्रिंटिंग प्रेस विभाग : प्रा. डॉ. अशोक पिंगळे.

हेही वाचा:

The post नाशिक : ‘मविप्र’ला मिळाले नवीन शिक्षणाधिकारी appeared first on पुढारी.