नाशिक : ‘मविप्र’ला हजार कोटींच्या पुढे नेण्यासाठी साथ द्या :नीलिमा पवार

pragati www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

विरोधकांकडून गेल्या १२ वर्षांपासून अफवांच्या हत्याराचा वापर सुरू आहे. तसेच वारस सभासदांच्या विरोधात विरोधक न्यायालयात का गेले याचा जाब विचारा. कोरोना काळात संस्थेच्या रुग्णालयामार्फत सेवा पुरविली असताना विरोधकांनी चालवलेली बदनामी खेदजनक आहे. मविप्र संस्था शिक्षणाचे व सरस्वतीचे मंदिर असून, भविष्यात संस्थेला हजार कोटींच्या पुढे घेऊन जाण्यासाठी साथ द्या, अशी साद नीलिमा पवार यांनी घातली.

देवळ्यातील वत्सला लॉन्समध्ये आयोजित प्रगती पॅनलच्या मेळाव्यात त्या बोलत होत्या. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ सभासद दगडू नारायण पाटील होते. व्यासपीठावर ज्येष्ठ नेते रामचंद्र पाटील, श्रीराम शेटे, आमदार डॉ. राहुल आहेर, यशवंत आहिरे, शंकर कोल्हे-खेडेकर, माणिकराव बोरस्ते, डॉ. सुनील ढिकले, डॉ. विलास बच्छाव, दिलीप मोरे, राजेंद्र पवार, माणिकराव शिंदे, सचिन पिंगळे, डॉ. विश्राम निकम, नाना महाले, योगेश आहेर उपस्थित होते. सभासदांसाठी स्वतंत्र आरोग्यसेवा विभाग उभारणार असून, सभासद पती-पत्नी व आई-वडिलांना मोफत सेवा दिली जाईल. रोबोटिक्स लॅब, स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, आयुर्वेद महाविद्यालय उभारणार असल्याचे पवार यांनी सांगितले. तर संस्थेच्या हितासाठी आहेर-पवार कुटुंब एकत्र आल्याचे केदा आहेर यांनी सांगितले. प्रगतीच्या मेळाव्यात माजी संचालक डॉ. विश्राम निकम, योगेश आहेर यांनी पॅनलला पाठिंबा दर्शविला. प्रमोद पाटील यांनी प्रास्ताविक केले. दिवसभरात बेज, जळगाव नेऊर, पिंपळगाव वाखारी, उमराणे, आगार येथील मेळाव्यांना उपस्थिती लक्षणीय होती.

एकविचाराचे लोक निवडून द्या : शेटे

समाजधुरिणांनी गोरगरीब घरातील मुलांच्या शिक्षणाची सोय केली. संस्थेला वाढवण्याचे काम मागील संचालक मंडळाने केले आहे. जिल्ह्याचा इतिहास पाहता अनेक विचारांचे लोक निवडून दिल्यावर संस्थांची वाट लागते. त्यामुळे एकविचाराचे लोक निवडून द्या, असे आवाहन ज्येष्ठ नेते श्रीराम शेटे यांनी केले.

हेही वाचा:

The post नाशिक : ‘मविप्र’ला हजार कोटींच्या पुढे नेण्यासाठी साथ द्या :नीलिमा पवार appeared first on पुढारी.