नाशिक : ‘मविप्र’ निवडणुकीसाठी 95 टक्के मतदान

मविप्र निवडणूक 3

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
राज्यातील दुसर्‍या क्रमांकाची शिक्षण संस्था असलेल्या मराठा विद्या प्रसारक समाज शिक्षण संस्था अर्थात मविप्रच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी रविवारी (दि.28) जिल्ह्यातील 14 मतदान केंद्रांवरील 53 बूथमध्ये मतदान प्रक्रिया पार पडली. दिवसभरात 95 टक्के सभासद मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. चांदवड तालुक्यात सर्वाधिक 98.10 टक्के तर नाशिक शहरात सर्वात कमी 87.33 टक्के मतदान झाले. मागील पंचवार्षिकच्या तुलनेत यंदा मतदानाचा टक्का वाढल्याने उमेदवारांची धाकधूक वाढली आहे.

मविप्र संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीत अध्यक्ष, उपाध्यक्ष, सरचिटणीस, चिटणीस, सभापती व उपसभापती या सहा प्रमुख पदांसह दोन महिला संचालक, 13 तालुका संचालक आणि तीन सेवक संचालक आदी 24 जागांसाठी मतदारांनी मतदान केले. यंदाच्या निवडणुकीत जिल्ह्यातील 10 हजार 197 सभासद मतदार निश्चित करण्यात आले होते. त्यामध्ये 8 हजार 844 पुरुष, तर 1 हजार 353 महिला मतदार होते. त्यापैकी 10 हजार 89 मतदारांनी मतदान केले. पदाधिकारी व तालुका संच्घालक पदासाठी 94.93 टक्के तर सेवक संचालक पदासाठी 88.34 टक्के मतदान झाले.

‘मविप्र’च्या मतदानासाठी सकाळपासूनच मतदारांमध्ये प्रचंड उत्साह होता. दुपारी उन्हामुळे काही मतदानाचा जोर ओसरल्याचे चित्र होते. तीननंतर पुन्हा एकदा मतदारांनी मतदानासाठी केंद्रांवर गर्दी केली होती. ग्रामीण भागातून मतदान केंद्रापर्यंत मतदारांना ने-आण करण्यासाठी दोन्ही पॅनलकडून वाहनव्यवस्था केली होती. अनेक केंद्रांवर सकाळपासून मतदारांच्या रांगा बघावयास मिळाल्या. किरकोळ अपवाद वगळता जिल्ह्यात मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडल्याचे निवडणूक मंडळाकडून सांगण्यात आले आहे.

दरम्यान, बहुतांश मतदान केंद्रांबाहेर उमेदवारांसह समर्थकांनी मोठी गर्दी केली होती. मतदानासाठी येणार्‍या प्रत्येक मतदाराला हात जोडून उमेदवारांकडून मतदानाचे आवाहन करण्यात येत होते. अनेक मतदान केंद्रांवर राजकीय मातब्बर दिवसभर तळ ठोकून होते. त्यामध्ये आमदार अ‍ॅड. राहुल ढिकले, माजी जि. प. सदस्य सीमंतिनी कोकाटे, संपत सकाळे, माजी नगरसेवक हेमंत शेट्टी आदींचा समावेश होता.

दिंडोरी @ 97 टक्के

दिंडोरी : तालुक्यातील 838 पैकी 813 म्हणजेच सरासरी 97 टक्के सभासदांनी मतदानाचा हक्क बजावला. दिंडोरी व पेठ तालुक्यांतील मतदारांनी दिंडोरी जनता विद्यालयातील केंद्रात सकाळपासूनच गर्दी केली होती. दोन्ही पॅनलच्या उमेदवारांसह त्यांच्या समर्थकांचीही गर्दी केंद्राबाहेर दिसून आली. दोन्ही पॅनलतर्फे मतदान केंद्राबाहेर बूथ उभारण्यात आले होते. तालुक्यातील दोन्ही उमेदवारांनीही सकाळी मतदानाचा हक्क बजावला. दरम्यान, दोन्ही पॅनलतर्फे विजयाचे दावे-प्रतिदावे केले जात आहेत.

सिन्नर @ 96 टक्के

सिन्नर : मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या निवडणुकीत सिन्नर तालुक्यात 443 पैकी 425 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. एकूण 96 टक्के मतदान झाले. संचालक पदासाठीचे उमेदवार हेमंत वाजे व कृष्णाजी भगत हे दोघेही मतदान केंद्राबाहेर तळ ठोकून होते. संस्थेच्या अध्यक्षपदासाठीचे उमेदवार आमदार माणिकराव कोकाटे, संचालकपदासाठीचे उमेदवार हेमंत वाजे, कृष्णाजी भगत यांनी या केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला. जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या सीमंतिनी कोकाटे यादेखील उपस्थित होत्या.

चांदवड @ 98 टक्के

चांदवड : तालुक्यातील 684 पैकी 668 मतदारांनी मतदान मतदान केले. दिवसभर 97.66 टक्के मतदान झाल्याची माहिती केंद्रप्रमुख प्रा. एस. एन. लोहकरे व प्रा. अमोल भगत यांनी दिली. येथील जे. आर. जे. महाविद्यालयात तीन बूथ केंद्रांमध्ये मतदान झाले. यावेळी आमदार डॉ. राहुल आहेर, प्रगती पॅनलचे उमेदवार उत्तमबाबा भालेराव, परिवर्तन पॅनलचे उमेदवार डॉ. सयाजीराव गायकवाड, माजी आमदार शिरीषकुमार कोतवाल, डॉ. आत्माराम कुंभार्डे, नितीन आहेर आदींसह दोन्ही पॅनलचे हितचिंतक उपस्थित होते.

सटाणा @ 94 टक्के

सटाणा : येथील एकूण 1416 पैकी 1335 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून, 94.28 टक्के मतदान झाले. तालुक्यात मोठी मतदार संख्या असल्याने दोन्हीही पॅनलकडून अखेरपर्यंत जोरदार प्रयत्न दिसून आले. सटाणा महाविद्यालयात मतदान केंद्राची व्यवस्था होती. मतदान केंद्रावर सकाळपासूनच कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पोलिस निरीक्षक सुभाष अनमुलवार केंद्राच्या प्रवेशद्वारावरच थांबून परिस्थितीवर नियंत्रण ठेवून होते. प्राचार्य डॉ. के. एन. गायकवाड यांनी मतदान केंद्र अधिकारी म्हणून कामकाज पाहिले.

देवळा : मविप्रच्या निवडणुकीसाठी 567 पैकी 550 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावून सर्वाधिक 97 टक्के मतदान झाले. सर्वांत जास्त वयाचे ज्येष्ठ सभासद माजी आमदार जनूभाऊ आहेर (102) यांनी, तर सर्वांत कमी वयाच्या लोमेश कापडणीस (19) याने मतदानाचा हक्क बजावला. प्रगती पॅनलकडून केदा आहेर, तर परिवर्तन पॅनलकडून विजय पगार हे उमेदवारी करीत होते.

The post नाशिक : ‘मविप्र’ निवडणुकीसाठी 95 टक्के मतदान appeared first on पुढारी.