नाशिक : महानगरपालिकेकडून हज यात्रेकरूंचे विशेष लसीकरण

हज यात्रा www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
नाशिक शहरातून हज यात्रेकरिता जाणार्‍या नागरिकांसाठी 23 व 24 मे रोजी महानगरपालिकेकडून विशेष लसीकरण सत्र ठेवण्यात आले होते. हज यात्रेदरम्यान कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये म्हणून लसीकरण करण्याचे आवाहन महानगरपालिकेने केले होते. त्याला नागरिकांचा प्रतिसाद मिळाला. मनपाच्या डॉ. झाकिर हुसेन रुग्णालयात दोन दिवसांत एकूण 350 हज यात्रेकरूंचे लसीकरण करण्यात आले. त्यामध्ये 44 जणांना इन्फ्लुएन्जाची लस देण्यात आली.

65 वर्षांवरील हज यात्रेकरूंना इन्फ्लुएन्झा लस दिली जात आहे. मेंदूज्वर आणि तोंडावाटे पोलिओची लसही देण्यात आली आहे. याशिवाय यात्रेकरूंच्या आरोग्याची तपासणीही करण्यात आली. बीपी, शुगर, फिटनेसची संपूर्ण आरोग्य तपासणी करण्यात आली. मनपाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे यांच्या मार्गदर्शनाखाली दोन दिवसांचे विशेष लसीकरण सत्र पार पडले. यावेळी झाकिर हुसेन रुग्णालयाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नितीन रावते, संत गाडगे महाराज शहरी आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. पीरझादा आइझा, नोडल वैद्यकीय अधिकारी डॉ. व्ही. एम. देवकर, सहायक वैद्यकीय अधिकारी अजिता साळुंखे, सोमय्या शेख, सुप्रिया शेख, शिवनंदा झाडे, वनिता बागूल, माया अडे, लता घोडके, चित्रा सोनवणे, विद्या थोरात, सुप्रिया कागदे आदी अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. मुस्लीम समाजात मक्का आणि मदिना ही अतिशय पवित्र ठिकाणे मानली जातात. प्रत्येक नागरिकाची इच्छा असते की, त्याने आयुष्यात एकदा तरी हजयात्रा करावी. नाशिक शहरातून दरवर्षी शेकडो मुस्लीम नागरिक हज यात्रेला जातात. हज यात्रेपूर्वी त्यांना अनेक औपचारिकता पार पाडाव्या लागतात. यासोबतच त्यांची वैद्यकीय तपासणी व लसीकरण करणे आवश्यक असते. त्यानंतर त्यांना हज यात्रेची परवानगी मिळते. म्हणून दोन दिवसांचे लसीकरण सत्र मनपाने आयोजित केले होते.

हेही वाचा:

The post नाशिक : महानगरपालिकेकडून हज यात्रेकरूंचे विशेष लसीकरण appeared first on पुढारी.