नाशिक : महानगरपालिकेचा पाणी आरक्षण प्रस्ताव मंजूर

गंगापूर धरण,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
महापालिकेने नाशिक शहराला 5800 दशलक्ष घनफूट पाणी आरक्षणाचा जिल्हा प्रशासन तसेच जलसंपदा विभागाला प्रस्ताव सादर केला असून, या पाणी आरक्षणाचा प्रस्ताव पालकमंत्री दादा भुसे यांनी मंजूर केला आहे. नाशिककरांना गंगापूर धरण समूहासह दारणा आणि मुकणे धरणांतून पाणीपुरवठा केला जातो. पालकमंत्र्यांनी प्रस्ताव मंजूर केल्यामुळे मनपाला यंदा 200 दशलक्ष घनफूट अतिरिक्त पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

मनपाला दरवर्षी 15 सप्टेंबरपर्यंत पाणी आरक्षणाची मागणी जिल्हाधिकारी तसेच जलसंपदा विभागाकडे नोंदवावी लागते. त्याप्रमाणे नाशिक महापालिकेने दोन्ही आस्थापनांकडे 5800 दशलक्ष घनफूट पाणी आरक्षणाचा प्रस्ताव मागील महिन्यातच सादर केला होता. त्यानुसार जिल्हाधिकार्‍यांमार्फत धरणातील पाणीसाठ्याचा आढावा घेऊन पालकमंत्री भुसे यांच्या उपस्थितीत बैठक घेऊन पुढील 290 दिवसांसाठी पाणी आरक्षण मंजूर करण्यात येणार होते. 15 ऑक्टोबर 2021 ते 31 जुलै 2022 या कालावधीसाठी महापालिकेने 5600 दलघफू पाणी आरक्षित करण्याची मागणी केली होती. महापालिकेने पाणी आरक्षण वाढवून मिळण्याची मागणी गृहीत धरत शहरासाठी 5,800 दलघफू पाणी आरक्षण देण्याचा निर्णय पालकमंत्री भुसे यांनी घेत त्यास मंजुरी दिली.

चालू वर्षी 200 दलघफू अतिरिक्त मिळणार आहे
असे मिळणार पाणी आरक्षण
– गंगापूर -4,200 दलघफू,
– दारणा – 100 दलघफू
– मुकणे -1500 दलघफू
एकूण – 5800 दलघफू.
मनपाकडून जिल्हा प्रशासनासह जलसंपदाला 5800 दशलक्ष घनफूट पाणी आरक्षणाची मागणी

हेही वाचा :

The post नाशिक : महानगरपालिकेचा पाणी आरक्षण प्रस्ताव मंजूर appeared first on पुढारी.