नाशिक महापालिकाचे झाले आमदनी अठण्णी… खर्चा रुपय्या..!

नाशिक महापालिका लोगो www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

महापालिका ही विविध सेवा पुरविणारी दत्तक संस्था मानली जाते. त्यानुसार मनपामार्फत वीज, पाणी, वाहतूक, रस्ते अशा महत्त्वाच्या सेवा पुरविल्या जातात. मात्र, या सेवांपोटी होणाऱ्या खर्चाच्या तुलनेत खर्चच अधिक होत असल्याचे समोर आले आहे. पाणीपुरवठ्यापोटी महावितरण कंपनीकडे दरवर्षी ४८ कोटींची बिले मनपाला अदा करावी लागतात. तर दुसरीकडे पाणीपट्टीपोटी मनपाच्या तिजोरीत अवघे ५५ कोटी रुपये जमा होतात. त्यातही पाणीपुरवठ्यासाठी देखभालीचा खर्च धरला, तर उत्पन्नापेक्षा खर्चाची बाजू वरचढ ठरते.

महापालिकेच्या अंदाजपत्रकात गेल्या काही वर्षांपासून जमा बाजूपेक्षा खर्चाचीच बाजू अधिक मोठी होत असल्याने मनपाकडून महसूल वृद्धीसाठी अनेक प्रयत्न केले जात आहेत. मात्र, त्यास पाहिजे तेवढा प्रतिसाद मिळत नसल्याने महसूल गोळा करण्यासाठी मनपाला दरवर्षी तारेवरची कसरत करावी लागते आहे. २०२२-२३ च्या अंदाजपत्रकात तर अपेक्षेपेक्षा जवळपास ४५० कोटी रुपयांची तूट निर्माण झालेली आहे. ही तूट भरून काढता येणार नाही. परंतु, घरपट्टी आणि पाणीपट्टीच्या माध्यमातून अधिकाधिक महसूल गोळा करण्यासाठी मनपाच्या विविध कर आकारणी विभागामार्फत प्रयत्न सुरू आहेत. मनपाकडून वीज, पाणी, बससेवा अशा काही महत्त्वाच्या मूलभूत सुविधा नागरिकांना ना नफा ना तोटा या तत्त्वावर पुरविल्या जातात. मात्र, दिलेले उद्दिष्टपूर्ती न होता त्याउलट खर्चच अधिक होत असल्याने मनपाला किमान उद्दिष्ट गाठण्यासाठी आपल्या कामकाजात बदल करण्याची गरज निर्माण झाली आहे. त्याचे एक उदाहरण म्हणजे पाणीपट्टीचे उद्दिष्ट मनपाला कधीच गाठता आले नाही. याउलट मनपाला पाणीपुरवठ्यासाठी येणारे वीजबिलच पाणीपट्टी कराच्या बरोबरीने आहे. या वर्षी पाणीपट्टी वसुलीचे मनपा कर आकारणी विभागाला ७० कोटींचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्यापैकी १३ मार्च २०२३ पर्यंत केवळ ५४ कोटी २८ लाख रुपये महसूल जमा झाला आहे. मागील वर्षी (२०२१-२२)पेक्षा ३३ लाख रुपये अधिक पाणीपट्टी वसूल झाली आहे. वसूल पाणीपट्टीच्या तुलनेत महापालिकेला पाणीपुरवठा वीज बिलापोटी वर्षाकाठी जवळपास ४८ कोटींचा खर्च येतो. महिन्याला चार कोटी रुपयांचे वीजबिल मनपाला भरावे लागत आहे. वीज बिलाव्यतिरिक्त देखभाल दुरुस्तीचा खर्च तर आणखी वेगळा आहे. यामुळे पाणीपट्टी वसुलीपेक्षा मनपाला त्यावर होणारा खर्चच अधिक येतो.

घरपट्टीचे १६५ कोटी वसूल
घरपट्टीसाठी कर आकारणी विभागाला आयुक्तांनी १८५ कोटींचे सुधारित उद्दिष्ट दिले आहे. त्यापैकी १३ मार्च २०२३ पर्यंत १६४ कोटी ९१ लाख रुपये वसूल झाले आहे. २०२१-२२ या आ‌‌‌‌‌र्थिक वर्षाच्या तुलनेत यंदाची वसुली ३६ कोटींनी अधिक आहे. मागील वर्षी १२७ कोटी ९६ लाख रुपयांचा महसूल घरपट्टीपोटी वसूल झाला होता.

हेही वाचा:

The post नाशिक महापालिकाचे झाले आमदनी अठण्णी... खर्चा रुपय्या..! appeared first on पुढारी.