नाशिक : महापालिका उद्याने पुन्हा ठेकेदारांच्या हाती देणार

नाशिक उद्यान,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

गेल्या तीन वर्षांपूर्वी शहरातील जवळपास साडेतीनशे उद्याने मनपाच्या उद्यान विभागामार्फत ठेकेदारांकडे देखभालीसाठी सोपविले होते. त्याची मुदत संपुष्टात आल्याने आता पुन्हा नव्याने उद्यान देखभाल दुरुस्तीकरिता निविदा प्रक्रिया राबवून उद्याने ठेकेदारांच्या हवाली करण्यात येणार आहे. नाशिक शहरात मनपाचे एकूण ४२९ इतके उद्याने आहेत.

नाशिक शहर हे उद्यानांचे आणि जॉगिंग ट्रॅकचे शहर म्हणूनदेखील ओळखले जाते. शहरात मोठ्या प्रमाणावर उद्याने असल्याने ही गोष्ट शहराच्या आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची बाब मानली जाते. शहरातील उद्याने चांगली आणि नीटनेटकी ठेवण्यासाठी मनपाकडे पुरेसे मनुष्यबळ नसल्याने तीन वर्षांपूर्वी मनपाने ४२९ पैकी जवळपास साडेतीनशे उद्याने ठेकेदारांकडे देखभाल दुरुस्तीकरिता सोपविले होते. मात्र, या तीन वर्षांच्या कालावधीत बहुतांश ठेकेदारांनी उद्यानांकडे दुर्लक्ष केल्याने आजमितीस उद्यानांची व तेथील खेळण्या आणि वृक्षवल्लीची अत्यंत बिकट अवस्था झालेली आहे. बऱ्याच ठेकेदारांकडेदेखील मनुष्यबळ नसताना ते केवळ कागदोपत्री दाखवून एक एका ठेकेदाराकडे तीन ते चार उद्याने देखभालीकरिता सोपविले होते. यामुळे मनपाकडून होणारे दुर्लक्ष ठेकेदारांची नेमणूक करूनही थांबली नाही. ठेकेदारांच्या माध्यमातूनही उद्यानांची देखभाल दुरुस्ती योग्य तऱ्हेने होत नसल्याचा अनुभव असूनही आता त्यांची मुदत संपुष्टात आल्यानंतर पुन्हा ठेकेदारांकडेच उद्याने सोपविण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यासाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात येणार असून, त्याची तयारी उद्यान विभागाने सुरू केली आहे.

उद्यान विभागाने गेल्या तीन वर्षांत ठेकेदारांकडून केवळ आठ लाख रुपयांचा दंड वसूल केला आहे. परंतु, याच काळात मनपाच्या उद्यानांमधील खेळण्या चोरीस गेल्या. ज्येष्ठ नागरिक तसेच उद्यान येणाऱ्या बालगोपाळांना बसण्यासाठी असलेले बेंच चोरीला जाण्याच्या घटना घडल्या आहेत. यामुळे तसे पाहिल्यास मनपाचेच आर्थिक नुकसान अधिक झाले आहे. शहरात महापालिकेत ४२९ इतकी उद्याने आहेत. यातील साडेतीनशे उद्याने ठेकेदारांकडे, तर उर्वरित उद्यानांची देखभाल महापालिकेमार्फतच पाहण्यात येत आहे.

उद्यानांचे तीन स्वतंत्र विभाग

नव्या निविदा प्रक्रियेनुसार उद्यान विभागाने उद्यानांचे तीन स्वतंत्र विभाग केले असून, त्यात महत्त्वाची उद्याने, कमी महत्त्वाची उद्याने आणि मनपानेच देखभाल करावयाची उद्याने यांचा समावेश आहे. त्यानुसार महत्त्वाची आणि कमी महत्त्वाच्या उद्यानांची ठेकेदारामार्फत देखभाल ठेवली जाणार असल्याची माहिती उद्यान विभागाचे उपआयुक्त विजयकुमार मुंडे यांनी सांगितले.

विभागनिहाय उद्यानांची संख्या

– पश्चिम विभाग – ७५

– पूर्व विभाग – ५२

– नाशिकरोड विभाग – १२२

– सिडको विभाग – ५६

– सातपूर विभाग – ३६

– पंचवटी विभाग – ८८

हेही वाचा :

The post नाशिक : महापालिका उद्याने पुन्हा ठेकेदारांच्या हाती देणार appeared first on पुढारी.