नाशिक महापालिका : घंटागाड्या कमी; कचरा संकलनात मात्र वाढ

नाशिक घंटागाडी ठेका,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
नव्या ठेक्यातील 398 घंटागाड्यांपैकी सुमारे 290 घंटागाड्यांमार्फतच कचरा संकलन केले जात असून, करारनाम्यानुसार निश्चित केलेल्या घंटागाड्यांपेक्षा कमी गाड्या असताना, कचरा संकलनाच्या प्रमाणात मात्र वाढ झाली आहे. कचरा संकलन जवळपास 750 मेट्रिक टनांपर्यंत पोहोचले आहे. त्यामुळे कचरा संकलन वाढण्यामागील नेमके कारण काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. दरम्यान, पूर्ण क्षमतेने कचरा संकलन केले जात असून, छोट्या गाड्या खतप्रकल्पावर जात नसल्याने त्यांची संख्या दिसत नसल्याचे घनकचरा व्यवस्थापन विभागाचे म्हणणे आहे.

महापालिकेच्या दोन तत्कालीन आयुक्तांसह विद्यमान आयुक्तांनी या ठेक्याची फाइल स्वत:कडे महिना महिना ठेवून घेत ठेक्याबाबत अनेक शंका-कुशंका उपस्थित केल्या होत्या. त्याबाबत समाधान झाल्यानंतर 10 महिन्यांनी नवीन ठेक्याला आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी चालना दिली. जुन्या ठेक्यात 274 इतक्याच गाड्या होत्या. आता त्यात 83 नवीन लहान गाड्यांची संख्या वाढविण्यात आली आहे. लहान व अरुंद गल्ल्या तसेच रस्त्यावरील कचरा संकलन छोट्या गाड्यांद्वारे करण्यात येणार आहे. उद्यान, हॉटेल्स, बाजारपेठा अशा विविध ठिकाणी अतिरिक्त गाड्या देण्यात आल्या असून, घंटागाड्यांची संख्या 398 इतकी झाली आहे. नवीन घंटागाड्या सुरू झाल्या. मात्र, छोट्या गाड्यांमध्ये कचरा टाकताना गैरसोयीचे ठरत असल्याने त्याविषयी तक्रारींचा पाऊसच लोकप्रतिनिधी तसेच नागरिकांकडून पाडण्यात आला. तसेच गाड्यांवर कर्मचारी नसल्याने नागरिकांना कचरा टाकावा लागत असून, लहान घंटागाड्या 12 मीटर रुंदीपेक्षा मोठ्या रस्त्यांवर येत असल्याने अरुंद गल्लीतील कचरा संकलनावर परिणाम झाला आहे. आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी पंचवटी तसेच अन्य भागांत जाऊन आढावा घेतला. मोठ्या रस्त्यांवर लहान घंटागाड्या न पाठविता कचरा संकलनासाठी कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्याचे आदेश त्यांनी ठेकेदारांना दिले होते.

घंटागाड्यांची संख्या कागदोपत्रीच…
गेल्या आठ दिवसांचा आढावा घेतला असता, 398 पैकी जेमतेम 290 घंटागाड्याच धावत असून, उर्वरित गाड्या आहेत की नाहीत, की केवळ कागदोपत्रीच दाखविल्या जात आहेत, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. पहिल्या दिवशी 244 घंटागाड्यांद्वारे कचरा संकलन झाले. दुसर्‍या दिवशी 278, तिसर्‍या दिवशी 249, चौथ्या दिवशी 302, पाचव्या दिवशी 322, सहाव्या दिवशी 294, सातव्या दिवशी 293, तर आठव्या दिवशी 303 घंटागाड्यांनी कचरा संकलन केले. ठेका सुरू झाल्याच्या पहिल्या दिवशी 527 मेट्रिक टन कचरा संकलन झाले. परंतु, कचरा संकलनाचे हेच प्रमाण 777 मेट्रिक टनांपर्यंत पोहोचले आहे.

आठ टन क्षमता असलेल्या 20, पाच टन क्षमता असलेल्या 20 आणि चार टन क्षमता असलेल्या 10 गाड्यांद्वारे कचरा खतप्रकल्पावर नेला जात आहे. छोट्या गाड्यांमधून संकलित झालेला कचरा मोठ्या गाड्यांमध्ये भरला जात आहे. गाड्यांची संख्या वाढल्याने कचरा संकलनातही वाढ झाली आहे. पंचवटी व सिडको विभागांच्या ठेक्यातील गोंधळामुळे पडून राहिलेल्या कचर्‍याचे संकलन केले जात असल्याने वाढीव कचरा मिळत आहे. अनेक वाहने अद्याप जीपीएसला जोडणे बाकी आहे. – डॉ. आवेश पलोड, संचालक, घनकचरा व्यवस्थापन विभाग, मनपा.

हेही वाचा:

The post नाशिक महापालिका : घंटागाड्या कमी; कचरा संकलनात मात्र वाढ appeared first on पुढारी.