नाशिक महापालिकेचे ५१ अधिकारी-कर्मचारी निवृत्त : मनुष्यबळाची चणचण

महापालिका कर्मचारी www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

गेल्या एप्रिल महिन्याच्या अखेरीस १८ कर्मचाऱ्यांना सेवापूर्ती निरोप दिल्यानंतर बुधवारी (दि.३१) आणखी ५१ कर्मचारी, अधिकारी सेवानिवृत्त झाले आहेत. मात्र, या कर्मचाऱ्यांच्या रिक्त जागांवर नोकरभरतीच्या प्रक्रियेला गतीच मिळत नसल्याने महापालिकेत मनुष्यबळाची प्रचंड चणचण असल्याची ओरड जवळपास सर्वच विभागांतून केली जात आहे.

महापालिकेतील ७०६ पदांची मेगा नोकरभरती राबविली जाणार असल्याचे या अगोदरच स्पष्ट केले आहे. मात्र, यामध्ये अनेक विघ्न येत असल्याने, या भरतीप्रक्रियेला गती मिळणार काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. सुरुवातील आयबीपीएस कंपनीच्या माध्यमातून भरतीप्रक्रिया राबविली जाणार होती. मात्र, आयबीपीएस कंपनीने नकार दिल्यानंतर टीसीएस कंपनीला प्रस्ताव दिला गेला. टीसीएसने हा प्रस्ताव स्वीकारला असला तरी, भरतीप्रक्रिया नेमकी केव्हा राबविली जाणार हा प्रश्न आहे. महापालिकेत ७०६ पदांमध्ये अग्निशमन विभागातील ३४८, आरोग्य व वैद्यकीय विभागातील ३५८ पदांचा समावेश आहे. गेल्या २४ वर्षांपासून नाशिक महापालिकेत कोणतीही नोकरभरती झाली नाही. ‘क’ वर्ग संवर्गातील मंजूर पदांची संख्या सात हजार ८२ असताना वयोमानानुसार निवृत्ती, स्वेच्छानिवृत्ती होणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांमुळे महापालिकेतील रिक्त पदांची संख्या तीन हजारांच्या आसपास आहे. महापालिकेत सद्यस्थितीत साडेचार हजारांच्या आसपास अधिकारी, कर्मचारी कार्यरत असून, ही संख्या अपुरी आहे. परिणामी नागरी सुविधा पुरविताना उपलब्ध कर्मचाऱ्यांवर प्रचंड ताण पडत आहे. दरम्यान, बुधवारी (दि.३१) अधीक्षक अभियंता शिवाजी चव्हाणके यांच्यासह ५१ कर्मचारी, अधिकाऱ्यांना सेवानिवृत्तीनिमित्त निरोप देण्यात आला. मनपा मुख्यालयातील स्थायी समिती सभागृहात याबाबतचा निरोप समारंभ आयोजित केला होता. यावेळी उपायुक्त करुणा डहाळे, नितीन नेर, विभागीय अधिकारी राजाराम जाधव यांनी कर्मचाऱ्यांचा सत्कार केला. त्याचबरोबर सेवानिवृत्त झालेल्या सर्व कर्मचाऱ्यांना कामगार कल्याण निधीतून प्रत्येकी दहा हजार रुपये अर्थसहाय्य दिले.

हेही वाचा:

The post नाशिक महापालिकेचे ५१ अधिकारी-कर्मचारी निवृत्त : मनुष्यबळाची चणचण appeared first on पुढारी.