Site icon

नाशिक : महापालिकेतर्फे स्पर्धेतून स्वच्छतेचा जागर, पथनाट्याच्या माध्यमातून जागृती

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आणि स्वर्वेक्षण २०२३ अंतर्गत महापालिकेतर्फे शालेय विद्यार्थ्यांची नृत्य आणि पथनाट्य स्पर्धा शनिवारी (दि.२७) महाकवी कालिदास कलामंदिर येथे घेण्यात आली. नदी प्रदूषण, पर्यावरण प्रदूषण, प्रदूषण रोखण्याचे उपाय, प्लास्टिकचे दुष्परिणाम, स्वच्छते प्रती नागरिकांचे कर्तव्य, वृक्षारोपणाचे महत्व अशा ज्वलंत सामाजिक विषयावर ही स्पर्धा होती.

शहरातून एकूण २६ शाळांचा सहभाग होता. पथनाट्यसाठी १४ तर फ्लॅश मॉबसाठी १२ प्रवेशिका आल्या होत्या. या स्पर्धेच्या माध्यमातून शहरातील विद्यार्थ्यांच्या कलागुणांसाठी एक व्यासपीठ उपलब्ध झाले. अभिनेता चिन्मय उदगीरकर, आयुक्त तथा प्रशासक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, अतिरीक्त आयुक्त अशोक अत्राम, उपसचिव रंजीत पाटील, उपायुक्त विजयकुमार मुंढे. उपायुक्त डॉ. दिलीप मेनकर, शहर अभियंता शिवकुमार वंजारी, अधिक्षक अभियंता शिवाजी चव्हाणके, शिक्षण विभाग प्रशासन अधिकारी सुनीता धनगर आदींच्या उपस्थितीत विजेत्यांना पारितोषिक देऊन गौरव करण्यात आला. शाळा स्तरावर सिंगल युज प्लास्टिक कसे गोळा करता येईल, याबाबत रोटरी क्लब ऑफ ग्रेप सिटीने अभिनव पद्धतीने बनवलेल्या उपकरणाचे यावेळी अनावरण झाले. मनपाच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाचे संचालक डॉ आवेश पलोड यांनी या स्पर्धेचे नियोजन केले होते. जनसंपर्क अधिकारी गिरीश निकम यांनी सूत्रसंचालन केले.

विजेते संघ : प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांकाच्या संघांना पारितोषिक देण्यात आले. अनुक्रमे १० हजार, साडेसात हजार, पाच हजार रुपयांचा धनादेश, ट्रॉफी, प्रशस्तीपत्र देऊन विजेत्यांचा गौरव करण्यात आला. नृत्य स्पर्धेत प्रथम पारितोषिक होरायझन स्कुल संघाला, द्वितीय नगरकर गुरुकुल प्राथमिक विद्यामंदीर आणि तिसरे पारीतोषिक मनपा शाळा क्र. ८५ वडाळा या संघाला देण्यात आले. पथनाट्य स्पर्धेत प्रथम पारितोषिक मराठा हायस्कुल संघाला, द्वितीय विद्याविकास माध्यमिक स्कुल, अंबड आणि तिसरे पारितोषिक मनपा शाळा क्र. 68 या संघाला प्रदान करण्यात आले. दोन्ही स्पर्धेसाठी जतिंदरसिंह, पूनम आचार्य, श्रीराम गोरे परीक्षक होते.

हेही वाचा:

The post नाशिक : महापालिकेतर्फे स्पर्धेतून स्वच्छतेचा जागर, पथनाट्याच्या माध्यमातून जागृती appeared first on पुढारी.

Exit mobile version