नाशिक : महापालिकेतही शिक्षकांच्या ऑनलाईन बदल्यांचे वारे सुरू

शिक्षक बदली

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

स्थानिक स्वराज्य संस्थेतील जिल्हा परिषदेनंतर आता नाशिक महापालिकेतही शिक्षक बदल्यांचे वारे वाहणार अाहेत. त्यानुसार विनंती बदल्यांचे प्रस्ताव मनपा आयुक्तांकडे लवकरच सादर करण्यात येणार असून, यावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर २० ते २५ टक्के या प्रमाणात प्रशासकीय बदल्या करण्यात येणार आहे. महापालिकेचे एकूण ८४२ प्राथमिक शिक्षक आहेत. यापैकी १७५ शिक्षकांच्या बदल्या आॅनलाईन पध्दतीने केल्या जातील.

जिल्हा परिषदेच्या शिक्षक बदल्यांसाठी आॅनलाईन पोर्टल सुरू केले आहे. अशा प्रकारच्या आॉनलाईन बदल्यांमुळे राजकीय हस्तक्षेप तर टळतोच शिवाय बदल्यांमध्ये पारदर्शकता देखील येण्यास हातभार लागतो. त्यानुसारच जिल्हा परिषदेनंतर आता नाशिक महापालिकेच्या शिक्षण विभागातर्फे प्राथमिक शिक्षक बदल्यांची प्रक्रिया आॉनलाईन पध्दतीनेच राबविण्यात येणार आहे. महापालिकेच्या शहरात ८८ प्राथमिक तर १२ माध्यमिक शाळा आहेत. या शाळांमध्ये एकूण ८४२ शिक्षक कार्यरत आहेत. पहिल्या टप्प्यात विनंती बदल्यांची प्रक्रिया पूर्ण केली जाईल आणि त्यानंतर प्रशासकीय बदल्यांची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. शासन नियमांनुसार २० टक्के प्रशासकीय बदल्या केल्या जातील. त्यासाठी आॅनलाईन प्रक्रिया राबविली जाईल. तत्पूर्वी शाळांकडून बदलीपात्र शिक्षकांच्या याद्या मागविल्या जाणार असून, त्यासाठी समिती नियुक्त केली जाणार आहे.

मनपाच्या शाळांमध्ये अनेक शिक्षक एकाच शाळेत जवळपास १५ ते २० वर्षांपासून ठाण मांडून आहेत. यामुळे इतर शिक्षकांवर अन्याय होतो. बहुतांश शिक्षकांचे राजकीय लागेबांधे असल्याने त्यांना सोयीच्या शाळा मिळतात. परंतु, राजकीय वशिला नसलेल्या शिक्षकांना मात्र वर्षानुवर्ष गैरसोयीच्या ठिकाणीच काम करावे लागते. हा प्रकार बंद होण्यासाठी आॉनलाईन बदल्यांची प्रक्रिया राबविली जाणार असून, त्यास लोकप्रतिनिधींकडून निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोध होऊ शकतो. कारण अनेक शिक्षकांचे लोकप्रतिनिधी तसेच माजी नगरसेवकांशी संबंध आहे. यामुळे आता मनपा प्रशासन बदल्यांबाबत काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागून आहे.

हेही वाचा :

The post नाशिक : महापालिकेतही शिक्षकांच्या ऑनलाईन बदल्यांचे वारे सुरू appeared first on पुढारी.