नाशिक महापालिकेत आता दहा स्वीकृत सदस्य

नाशिक मनपा www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

महापालिकांच्या कामकाजात गुणात्मक वाढ करण्याच्या दृष्टीने नामनिर्देशित सदस्यांच्या संख्येत सुधारणा करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. या निर्णयामुळे नाशिक महापालिकेत दहा स्वीकृत सदस्यांची नियुक्ती होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मनपा निवडणुकीनंतरच या स्वीकृत सदस्यांची नियुक्ती होऊ शकते.

मुंबई महापालिका अधिनियम, १८८८ मधील कलम ५(१) (ब) व महाराष्ट्र महापालिका अधिनियम, १९४९ मधील कलम ५ (२) (ब)मध्ये नामनिर्देशित करावयाच्या पालिका सदस्यांचे प्रमाण निश्चित करण्यात आले आहे. सध्या नाशिक महापालिकेतील नामनिर्देशित करावयाच्या सदस्यांची संख्या पाच आहे. मार्च २०२२ मध्ये नाशिक मनपातील लोकप्रतिनिधींची पंचवार्षिक मुदत संपुष्टात आल्याने नामनिर्देशित पाच स्वीकृत सदस्यांचा कार्यकालदेखील संपुष्टात आला. राज्यात शहरी प्रशासनास सहकार्य करण्यासाठी व अनुभवी, कार्यकुशल व नागरी प्रशासनाचे ज्ञान असलेल्या व शासनाने केलेल्या नियमानुसार विहित अर्हता धारण करणाऱ्या व्यक्तींची निवड नामनिर्देशित सदस्य म्हणून केली जाते. नामनिर्देशित सदस्यांच्या संख्येत वाढ करण्याची आवश्यकता विचारात घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार नाशिक महापालिकेतील स्वीकृत सदस्यांची संख्या आता पाचवरून दहा इतकी होईल.

दरम्यान, शासनाच्या या निर्णयामुळे नामनिर्देशित, स्वीकृत सदस्य नियुक्तीसाठी राजकीय पक्षांतील इच्छुक कार्यकर्त्यांच्या अपेक्षा वाढीस लागल्या आहेत. स्वीकृत सदस्यांची संख्या आता दुप्पट होणार असल्याने राजकीय पक्षांना या पदावर अधिकाधिक इच्छुकांना संधी देता येणार आहे. त्यामुळे इच्छुकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत.

The post नाशिक महापालिकेत आता दहा स्वीकृत सदस्य appeared first on पुढारी.