नाशिक महापालिकेत भाजपचे ‘मिशन ७०’

नाशिक मनपा,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे प्रभारी तथा ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी कार्यकर्ते तसेच पदाधिकाऱ्यांना कानमंत्र देत नाशिक महापालिकेसाठी ‘मिशन ७०’ चा नारा दिला. मनपावर भाजपची सत्ता कायम ठेवण्यासाठी मतदारांपर्यंत पोहोचण्याचे आवाहनही केले. १८ ते ३० वयोगटाला टार्गेट ठेवून सोशल मीडियामार्फत पक्षाची ध्येयधोरणे आणि विकासकामे पोहोचविण्याचे आदेशही त्यांनी कार्यकर्त्यांना दिले.

भाजप प्रदेश कार्यकारिणीची बैठक यशस्वीपणे पार पाडल्याबद्दल ना. महाजन यांच्या उपस्थितीत प्रसाद मंगल कार्यालयात शहर पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा आभार सोहळा आयोजित करण्यात आला होता. सोहळ्यास संघटनमंत्री रवींद्र अनासपुरे, भाजप आमदार देवयानी फरांदे, ॲड. राहुल ढिकले, सीमा हिरे, शहराध्यक्ष गिरीश पालवे, लक्ष्मण सावजी, विजय साने, माजी महापौर सतीश कुलकर्णी, माजी सभापती गणेश गिते, महिला शहराध्यक्षा हिमगौरी आहेर-आडके तसेच भाजप शहर सरचिटणीस प्रशांत जाधव, सुनील केदार, पवन भगूरकर, जगन पाटील आदी उपस्थित होते. बैठकीत सावजी, साने आणि आ. फरांदेंनी शिवसेनेचे बेगडी हिंदुत्व आणि भाजपची फसवणूक करून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने काँग्रेस, राष्ट्रवादीशी युती केल्यामुळे मतदारांची फसवणूक केल्याचा आरोप करत आघाडीच्या काळात झालेल्या भ्रष्टाचारासंदर्भात जोरदार टीका केली. समारोप सत्रात ना. महाजन यांनी प्रदेश कार्यकारिणीची बैठक चांगल्या पद्धतीने केल्यामुळे पदाधिकाऱ्यांचे कौतुक केले. प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीनिमित्त सर्वांचेच आदरातिथ्य उत्तमरीत्या केल्यामुळे राज्यभरातून कौतुक होत असल्याचे त्यांनी सांगितले. आता आगामी निवडणूक सर्वांसाठी महत्त्वाचा टप्पा असून, लोकसभा, विधानसभा तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सज्ज राहावे, असेही आवाहन त्यांनी केले.

ना. महाजनांकडून कौतुक

प्रदेश बैठकीला आलेल्या प्रत्येक मंत्री खासदार, आमदार तसेच पदाधिकाऱ्यांना नाशिक पूर्वचे आमदार ॲड. राहुल ढिकले यांनी द्राक्ष व चिवड्याची भेट दिली. माजी सभागृह नेते दिनकर पाटील यांनी पंडित स्व. दीनदयाल, भारतमाता यांच्या प्रतिमेची भेट दिली. तर शहर उपाध्यक्ष नीलेश बोरा यांनी खानपान व निवासाची व्यवस्था उत्तम ठेवल्याबद्दल ना. गिरीश महाजन यांनी कौतुक केले.

कसब्यात ठाण मांडणार

पुण्यातील कसबा व पिंपरी चिंचवड या दोन विधानसभा निवडणुका सर्व पक्षांसाठी प्रतिष्ठेच्या मानल्या जात आहेत. त्यातील कसबा मतदारसंघ हा भाजपचा पारंपरिक मतदारसंघ आहे. मात्र अटीतटीची लढत होत असल्याने प्रत्येकाने काही दिवसांसाठी त्या मतदारसंघामध्ये ठाण मांडून राहावे, अशी सूचनाही ना. महाजन यांनी केली. कसब्यात मी स्वतः असेन. शक्य झाल्यास स्वतःचे पैसे खर्च करून कोणत्याही व्यवस्थेची वाट न बघता हजेरी लावावी. आपापले नातेवाईक तसेच मित्र परिवाराशी संपर्क साधून कसबा विधानसभा निवडणुकीत भाजपला मदत करण्यासाठी प्रयत्न करावेत, असेही आवाहन त्यांनी केले.

हेही वाचा : 

The post नाशिक महापालिकेत भाजपचे 'मिशन ७०' appeared first on पुढारी.