Site icon

नाशिक महापालिकेत श्वान निर्बीजीकरणाचा नव्याने ठेका

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
महापालिकेच्या पशुवैद्यकीय विभागाकडून श्वान निर्बीजीकरण प्रक्रिया राबविली जात असून, श्वान निर्बीजीकरणाचा ठेका 12 एप्रिल रोजी संपुष्टात आला आहे. दरम्यान, आता हा ठेका नव्याने दिला जाणार असून, पुढच्या काही दिवसांत श्वान निर्बीजीकरण निविदा पूर्ण होण्याची शक्यता आहे.

शहराचा विस्तार गेल्या काही वर्षांपासून वाढत आहे. त्यातच मोकाट श्वानांची संख्या वाढली आहे. नाशिकरोड, पंचवटी, सिडको, सातपूर, पश्चिम व नाशिक पूर्व या सहाही विभागांतील विविध भागांत मोकाट श्वानांचे टोळके रात्रभर दिसून येतात. यापूर्वी वयोवृद्ध ते लहानग्यांवर मोकाट श्वानांकडून हल्ले झाल्याचे प्रकार समोर आले आहेत. मोकाट श्वानांची संख्या नियंत्रणात असायला हवी, यासाठी निर्बीजीकरण करून श्वानांच्या संख्येवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला जातो. दरम्यान, हा ठेका संपुष्टात आल्यावर प्रारंभी श्वान निर्बीजीकरणासाठी राबवलेल्या ठेक्यासाठी कोणतीही संस्था पुढे आली नाही. एका वर्षासाठी हा ठेका शरण संस्थेला देण्यात आला होता. श्वानांचा प्रजनन कालावधी जादा असल्याने निर्बीजीकरणासाठी शहर परिसरात दोन वाहनांची व्यवस्था या संस्थेने केली होती. तसेच पालिकेच्या अ‍ॅपवर नागरिकांना तक्रार करण्याची व्यवस्था असल्याने नागरिक ऑनलाइन तक्रार करतात. यानंतर पालिकेकडून तक्रारीची तत्काळ दखल घेऊन ज्या परिसरात श्वान आहे, तेथून पकडून विल्होळी येथील केंद्रावर नेले जाते. केंद्रावर श्वानांचे निर्बीजीकरण झाल्यानंतर तीन दिवस निगराणीत ठेवल्यानंतर पुन्हा त्यांच्या परिसरात सोडले जाते. शहरात दिवसाला 30 ते 40 श्वान पकडले जातात. 2022 ते 2023 दरम्यान नऊ हजारांहून अधिक श्वानांचे निर्बीजीकरण केले. श्वान निर्बीजीकरण ठेक्याची मुदत संपुष्टात आल्याने पशुवैद्यकीय विभागाकडून राबवली जाणारी निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. निविदा खुली करून अटी-शर्ती पूर्ण करणार्‍या संस्थेला श्वान निर्बीजीकरणाचे काम दिले जाणार आहे.

हेही वाचा:

The post नाशिक महापालिकेत श्वान निर्बीजीकरणाचा नव्याने ठेका appeared first on पुढारी.

Exit mobile version