नाशिक महापालिकेत १०० प्लस सदस्य निवडून आणावे- बावनकुळे

चंद्रशेखर बावनकुळे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

२०२४ मध्ये राज्यातून भाजपचे ४० खासदार तसेच २०० आमदार निवडून आणत तुकड्यांच्या खेळापासून दूर राहायचे आहे. नाशिकमध्ये आमदार छगन भुजबळ यांना खाली खेचण्याची जबाबदारी आपली असल्याचे प्रतिपादन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. जनसंवाद, जनसंपर्क आणि व्यक्तिगत भेटीगाठींवर भर देण्याच्या सूचना करताना, भाजपचे नाशिक महापालिकेत १०० व जिल्हा परिषदेत ४० प्लस सदस्य निवडून आणावे, असे आवाहन बावनकुळे यांनी केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मजबूत ठेवण्यासाठी आपण त्यांना भक्कम पाठिंबा देऊ या, असेही ते म्हणाले.

भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर बावनकुळे हे रविवारी (दि. ११) प्रथमच नाशिक दाैऱ्यावर आले. सिडकोतील स्प्लेंन्डर हाॅल येथे पक्षाच्या शहर-जिल्हा बूथ कार्यकारिणी पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी संपर्कप्रमुख रवी अनासपुरे, आमदार सर्वश्री देवयानी फरांदे, सीमा हिरे, डॉ. राहुल ढिकले, शहराध्यक्ष गिरीश पालवे, जिल्हाध्यक्ष केदा आहेर, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण, माजी आमदार बाळासाहेब सानप, माजी महापौर सतीश कुलकर्णी तसेच विजय साने, विक्रांत पाटील आदी उपस्थित होते.

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, गेल्या अडीच वर्षांत राज्याचा विकास थांबला होता. नाशिकमध्येही पालकमंत्री छगन भुजबळ हे कामाला आले नाहीत. मात्र, राज्यात आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची खरी शिवसेना व भाजप युतीचे सरकार आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे १८ महिने गायब होते, अशा शब्दांत टीका करताना सध्या राज्याला १८ तास काम करणारे मुख्यमंत्री लाभले असून, तेच खरे मर्द मराठा शिवसैनिक आहेत. त्यांनीच खऱ्या अर्थाने महाराष्ट्र वाचविल्याचे कौतुकोद‌्गार बावनकुळे यांनी काढले.

१९९० मध्ये काँग्रेसची लाट असताना, त्या वेळी पक्षवाढीसाठी प्रा. ना. स. फरांदे यांनी एसटीने प्रवास केला. आजच्या घडीला पक्षात येण्यासाठी चढाओढ सुरू आहे. मात्र, पक्षात आता नेते अधिक झाले असून, कार्यकर्त्यांची आणखी मजबूत फळी उभारण्याची गरज बावनकुळे यांनी व्यक्त केली. इतर पक्षांतील नेत्यांना भाजपमध्ये प्रवेश देताना जुन्या कार्यकर्त्यांवर अन्याय होणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली. ज्या भागात पक्ष संघटना कमकुवत आहे, तिथे ती अधिक मजबूत करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे बावनकुळे म्हणाले.

२०२४ मध्ये नाशिक जिल्ह्यातील सर्वच्या सर्व आमदार हे भाजपचे आणताना त्यावेळी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरे गटाला नाशिकमध्ये बूथ कार्यकर्ते मिळू नये, यासाठी कामाला लागावे. तत्पूर्वी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका असून, त्या कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत. सभागृहात सध्या ७५२ कार्यकर्ते उपस्थित असूून, त्यामुळे अशा संघटनेला कोणीही हरवू शकत नाही. पण योग्य वेळी मेहनत न घेतल्यास निसटता पराभव पाहावा लागताे, असे सांगताना महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समित्या व नगरपालिकांमध्ये भाजपचा झेंडा फडकविण्यासाठी तयारी लागावे, असे आवाहन बावनकुळे यांनी केले. विविध पक्षांतील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला.

काँग्रेस खाली येईल

भारत जोडाे यात्रेवरून बावनकुळे यांनी राहुल गांधींवर निशाणा साधला. ५६ हजार रुपयांचा विदेशी टी-शर्ट परिधान करून राहुल गांधी यात्रेत सहभागी झाले. मात्र, त्यांची यात्रा ज्या-ज्या भागातून जाईल, तेथे काँग्रेस खाली येईल, अशी खोचक टीका बावनकुळे यांनी केली. दरम्यान, उद्धव ठाकरे गटाची युवासेना ही पेंग्विन सेना झाली, अशा शब्दांत खिल्ली उडविली.

बावनकुळे म्हणाले…

-शासनाच्या योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवा.

-लाभार्थ्यांकडून स्व-हस्ताक्षरात पंतप्रधानांच्या आभाराचे पत्र लिहून घ्यावे.

-१८ ते २५ वयोगटातील १० लाख युवा वाॅरियर्स तयार करावे.

-एका कार्यकर्त्यावर २० घरांची जबाबदारी सोपवावी.

-शत-प्रतिशत भाजपचा नारा घरोघरी पाेहोचवा.

-पुढील महिन्यापर्यंत १ हजार कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश करावा.

हेही वाचा :

The post नाशिक महापालिकेत १०० प्लस सदस्य निवडून आणावे- बावनकुळे appeared first on पुढारी.