नाशिक : महापालिकेवर पिण्याच्या पाण्यासाठी हंडा मोर्चा

हंडा मोर्चा,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा 

नाशिक शहर परिसरात मुबलक असा पाऊस सतत पडत आहे व नाशिक शहरातील धरणांची पाण्याची पातळीसुद्धा परिपूर्ण आहे. असे असताना मनपा हद्दीत समाविष्ट असलेल्या ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. गेल्या २० वर्षात कधीही शहराला पिण्याच्या पाण्याची समस्या जाणवली नाही. मात्र नाशिक महापालिकेवर प्रशासक नियुक्त झाल्यापासून पाण्याची समस्या जाणवत आहे. या समस्येसंदर्भात माजी सभागृह नेते दिनकर पाटील व अमोल पाटील यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी (दि.१२) महापालिकेवर हंडा मोर्चा काढण्यात आला.

नाशिक मनपा हद्दीतील शिवाजीनगर, श्रमिकनगर, ध्रुवनगर, गंगापूर, अशोकनगर, धर्माजी कालॅनी हा परिसर गंगापूर धरणाला लागून आहे. याच परिसरात जलशुद्धीकरण केंद्र आहे. असे असताना येथील नागरिकांना पिण्याचे पाणी मिळत नाही, ही शोकांतिका आहे. नाशिक महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागात सावळा गोंधळ चालू आहे. या सर्व समस्या सोडवण्यासाठी भाजपचे माजी सभागृहनेते दिनकर पाटील आणि अमोल पाटील यांच्या नेतृत्वाखाली नाशिक महापालिकेवर शेकडो महिलांनी हंडा मोर्चा काढत निषेध नोंदविला.

नाशिक शहरात नुसता पाणी प्रश्नच नाही तर रस्त्यांची सुद्धा भयानक स्थिती झाली आहे. अनेक ठिकाणी रस्त्यांना मोठमोठे खड्डे पडले आहेत. रस्त्यांची कामे सुद्धा अतिशय निष्कृष्ट दर्जाची झालेली आहेत. त्यामुळे ही कामे संबंधीत ठेकेदारांकडून पूर्ण करून घ्यावे.

तर आठ दिवसांनी जनआंदोलन

गंगापूर धरण परिसरात विजेचा प्रश्न नेहमी भेडसावत असतो. त्यासाठी त्याठिकाणी सोलर सिस्टिमचा पर्याय म्हणून वापर करण्यात यावा, अशी मागणी दिनकर पाटील यांनी केली आहे. सर्व समस्या आठ दिवसात न सोडविल्यास जन आंदोलन करण्याचा इशारा पाटील यांनी दिला आहे. भाजपचे सरचिटणीस जगन पाटील, माजी नगरसेविका लता दिनकर पाटील, भाजप युवा मोर्चा उपाध्यक्ष अमोल पाटील, माजी नगरसेवक रवींद्र धिवरे, माजी नगरसेविका माधुरी बोलकर आदी शेकडो महिला उपस्थित होत्या.

हेही वाचा :

The post नाशिक : महापालिकेवर पिण्याच्या पाण्यासाठी हंडा मोर्चा appeared first on पुढारी.