नाशिक : महावितरणच्या ‘अभय’ला 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
महावितरणने विलासराव देशमुख अभय योजना-2022 ला डिसेंबरअखेर मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे वीजबिलांच्या थकबाकीपोटी कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित केलेल्या घरगुती ग्राहकांसह व्यवसाय आणि उद्योग ग्राहकांना या निर्णयामुळे फायदा होणार आहे.

अभय योजनेंतर्गत वीज ग्राहकांना थकबाकीची मूळ रक्कम हप्तेवारीने किंवा एकरकमी भरल्यास त्यावरील व्याज आणि विलंब आकार पूर्णतः माफ केले जाते. योजनेनुसार 31 डिसेंबर 2021 रोजी किंवा त्यापूर्वी थकबाकीपोटी कायमचा वीजपुरवठा खंडित केलेले सर्व बिगर कृषी उच्चदाब आणि लघुदाब ग्राहक योजनेत पात्र आहेत. मात्र, योजनेसाठी 31 ऑगस्टची डेडलाइन असल्याने बहुतांश ग्राहकांनी त्यास मागणी केली होती. त्यानुसार महावितरणने डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. अभय योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक आणि पात्र ग्राहकांनी 31 डिसेंबरपर्यंत केवळ ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावयाचा आहे. थकबाकी एकरकमी भरण्यास इच्छुक असलेल्या ग्राहकांनी उच्चदाबाच्या वीजजोडणीसाठी मूळ थकबाकीच्या 95 टक्के किंवा लघुदाबाच्या वीजजोडणीसाठी मूळ थकबाकीच्या 90 टक्के आणि सोबतच अर्जमंजुरीच्या 30 दिवसांच्या आत आवश्यक कायदेशीर शुल्क भरावे लागेल. हप्तेवारीने पैसे भरण्यास इच्छुक असलेल्या ग्राहकांना पहिला हप्ता हा मूळ थकबाकीच्या 30 टक्के आणि सोबत अर्जमंजुरीच्या 7 दिवसांच्या आत आवश्यक कायदेशीर शुल्क भरावयाचे असून, उर्वरित रक्कम ठरावीक हप्त्यांत महिन्याच्या शेवटी किंवा त्यापूर्वी भरायची आहे.

.. तर योजनेतून अपात्र ठरणार
राज्यातील ज्या ग्राहकांचे अर्ज 30 सप्टेंबर रोजी किंवा त्यापूर्वी अर्ज मंजूर असतील, अशांनी 31 ऑक्टोबरपर्यंत थकबाकीच्या 30 टक्क्यांचा पहिला हप्ता किंवा संपूर्ण थकबाकी एकरकमी भरावयाची आहे. हप्तेवारीचा लाभ घेणारा ग्राहक हप्ता भरण्यास अपयशी ठरल्यास तो योजनेतून अपात्र ठरेल. त्यास कोणतेही लाभ दिले जाणार नाहीत. थकबाकीपोटी कायमचा वीजपुरवठा खंडित केलेले सर्व बिगर कृषी उच्चदाब आणि लघुदाब ग्राहकांनी अधिकाधिक संख्येने या योजनेत सहभागी होण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.

The post नाशिक : महावितरणच्या ‘अभय’ला 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ appeared first on पुढारी.