नाशिक : ‘महाश्रामणेर’मध्ये उलगडले बौद्ध जीवन संस्काराचे पाठ

महाश्रामनेर शिबिर www.pudhari.news

सिडको : पुढारी वृत्तसेवा

अखिल भारतीय समता सैनिक दल व भारतीय बौद्ध महासभा यांच्या वतीने नाशिकच्या गोल्फ क्लबवर सुरू असलेल्या महाबौद्ध धम्म मेळावा आणि महाश्रामणेर शिबिरात उपासकांसाठी श्रामणेर प्रशिक्षणासह बौद्ध जीवन संस्काराचे पाठ उलगडून दाखविण्यात आले. आचरणशील संस्कारातून बहुजन हिताय बहुजन सुखाय हे साध्य करण्यासाठी भन्ते धम्मरत्न यांनी विपश्यना म्हणजे काय, हे समजावून सांगितले.

सकाळच्या पहिल्या सत्रात भन्ते नागसेन यांनी आनापान सती विपश्यनेबद्दल मार्गदर्शन केले. भन्ते धम्मपाल कौंडिण्य, सारीपुत्र महामोगल्यायन यांनी वंदना सूत्रपठण शिकविले. त्यानंतर बौद्ध जीवन संस्कार पाठांबद्दल मार्गदर्शन करण्यात आले. संस्कार विधी कसा करावा आणि साहित्याची मांडणी यांचे महत्त्व याबाबतही भन्ते नागसेन यांनी मार्गदर्शन केले. धम्मबोधी भन्ते यांनी पराभव सूक्त यावर मार्मिक मार्गदर्शन केले. जीवन जगत असताना माणसाचा पराभव कसा होतो, हे समजावून सांगितले. शिबिरात भगवान गौतम बुद्धांनी मानवी दैनंदिन जीवनासंबंधीचे तत्त्वज्ञान सांगितले आहे, त्या संदर्भात शिबिरात दिवसभर वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये चर्चा करण्यात आली. धम्म शिबिरास भदंत ज्ञानज्योती महाथेरो, भदंत बोधीपाल, भदंत धम्मरत्न, भदंत सुगत, भदंत आर्यनाग, भदंत शीलरत्न आदींसह देशभरातील भदंत व भिक्खुगण उपस्थित आहेत. विशेष म्हणजे यानिमित्त १० दिवस रॅली, प्रशिक्षण आदी कार्यक्रम होत असून दि. ५ ऑक्टोबरला मेळाव्याचा समारोप होणार आहे.

याप्रसंगी बीएमए ग्रुपचे अध्यक्ष मोहन आढांगळे, रमेश बनसोड, प्रदीप पोळ, राहुल बच्छाव, के. के. बच्छाव, गुणवंत वाघ, धीरज जाधव, रत्नमाला लोंढे, बाळासाहेब शिरसाठ, अशोक गवई आदींसह अखिल भारतीय समता सैनिक दलाचे व भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित आहेत. शिबिरानिमित्त गोल्फ क्लब ते नाशिकरोड, गोल्फ क्लब ते सातपूर, गोल्फ क्लब ते बौद्ध लेणी अशा भव्य मिरवणुकांचे आयोजन करण्यात आलेले आहे.

हेही वाचा:

The post नाशिक : 'महाश्रामणेर'मध्ये उलगडले बौद्ध जीवन संस्काराचे पाठ appeared first on पुढारी.