नाशिक : महिंद्रातून स्पेअर पार्ट चोरणारे तीन कंत्राटी कामगार गजाआड

महिंद्रा www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

महिंद्रा ॲण्ड महिंद्रात व्हेरिटाे कारसाठी बनविल्या जाणाऱ्या ‘फ्युएल इंजेक्टर’ या महागड्या सुट्या भागांची चाेरी करून भंगार बाजारात विक्री करणाऱ्या कंपनीतील तीन कंत्राटी कामगारांना गुन्हे शाखा युनिट एकच्या युनिट पथकाने पकडले. त्यांच्याकडून साडेचार लाख रुपयांचे स्पेअर पार्ट हस्तगत करण्यात आले. चाेरीचा माल खरेदी करणाऱ्या भंगार विक्रेत्यासही पोलिसांनी पकडले आहे.

गजानन रामभाऊ भालेराव (२९), सिद्धार्थ उमाजी नरवडे (२९, दाेघे रा. प्रबुद्धनगर, सातपूर) व आकाश बाळू साळवे (२६, रा. महिरावणी) अशी तिघा संशयित चोरट्यांची नावे असून, अताउल्ला समशुल्ला खान (४६, रा. मिल्लतनगर, वडाळा) असे भंगार विक्रेत्याचे नाव आहे. महिंद्रा ॲण्ड महिंद्रा कंपनीच्या सीकेडी प्लँटमधून चोरट्यांनी १५ जुलै ते ५ ऑगस्टदरम्यान इंजिनचे फ्युएल इंजेक्टर पार्ट चाेरून नेल्याची तक्रार व्यवस्थापक प्रभाकर जाधव (रा. राणेनगर) यांनी दिली हाेती. गुन्ह्याचा तपास सुरू असताना गुन्हे शाखा युनिट एकचे पोलिस नाईक प्रशांत मरकड यांना संशयितांची माहिती मिळाली. त्यांनी युनिट एकचे पाेलिस निरीक्षक विजय ढमाळ यांना माहिती दिल्यानंतर ढमाळ यांनी पथक रवाना केले. त्यानुसार सातपूर परिसरातून संशयितांना पकडले. चौकशीत त्यांनी चोरीचा माल भंगार विक्रेत्यास विकल्याची कबुली दिली. सहायक उपनिरीक्षक रवींद्र बागूल, प्रवीण वाघमारे, शरद सोनवणे, नाझीम पठाण, प्रदीप म्हसदे, प्रशांत मरकड, विशाल देवरे, महेश साळुंके यांनी कामगिरी केली.

हेही वाचा:

The post नाशिक : महिंद्रातून स्पेअर पार्ट चोरणारे तीन कंत्राटी कामगार गजाआड appeared first on पुढारी.