नाशिक : मांजाने शेतकर्‍याचा गळा कापला

शेतकरी मांजा www.pudhari.news

नाशिक (चांदवड) : पुढारी वृत्तसेवा
शहरातील तहसील कार्यालयात कामानिमित्त जात असलेल्या दुचाकीस्वाराचा पतंगाच्या मांजाने गळा कापला जाऊन तो गंभीर जखमी होत रस्त्यावरच कोसळला. जखमीला नागरिकांनी तत्काळ खासगी दवाखान्यात नेले. गळ्याला गंभीर दुखापत झाल्याने प्राथमिक उपचार करून अधिक उपचारासाठी मालेगावला हलविण्यात आले. यंदाच्या पतंगाच्या हंगामातील ही दुसरी घटना असून, पहिली घटना मंगळवारी नाशिकला सातपूर परिसरात घडली.

तालुक्यातील शिंदे गावातील शेतकरी राजेश कचेश्वर शिंदे (38) हे बुधवारी (दि. 7) साडेअकराच्या सुमारास चांदवड शहरातील आठवडे बाजार येथून तहसील कार्यालयाकडे शासकीय कामासाठी दुचाकीने जात होते. त्यावेळी शिंदे यांच्या गळ्याला पतंगाचा धारदार मांजा अडकला. त्यात गळा कापला जाऊन ते रस्त्यावर कोसळले. काही समजायच्या आत त्यांच्या गळ्यातून रक्तस्त्राव सुरू झाला. यावेळी अ‍ॅड. प्रवीण कोतवाल, स्वप्नील बोरसे व इतर नागरिकांनी त्यांना उचलून जवळच्या खासगी दवाखान्यात उपचारासाठी नेले. तेथे डॉ. अरुण निकम यांनी शिंदे यांच्या गळ्यावर सहा टाके टाकून रक्तस्त्राव बंद केला. एका ठिकाणी गळ्याला गंभीर इजा झाली असल्याने त्यांना मालेगाव येथे हलविण्यात आले. त्यांच्या हाताची बोटेदेखील पतंगाच्या मांजाने कापली गेली आहे. या घटनेत शिंदे यांचे थोडक्यात प्राण वाचले. या घटनेनंतर शहरातील नागरिकांनी धारदार मांजा विक्री करणार्‍या दुकानदारांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. यामुळे पोलिसांनी शहरात मांजा विक्री करणार्‍या दोघांना पोलिसात बोलवले होते. मकरसंक्रांतीनिमित्त पतंग उडविण्याचा छंद कोणाच्याही जीवावर बेतणार नाही, यासाठी साधा दोर्‍याच्या सहाय्याने नागरिकांनी पतंग उडवण्याचे आवाहन केले जात आहे. सातपूर परिसरात प्रवीण वाघ हा दुचाकीस्वार खोका मार्केटकडे जात असताना मांजा त्यांच्या गळ्याला अडकून तो कापला गेला. प्रचंड रक्तस्त्राव सुरू होऊन तोही रस्त्यावर कोसळला. परंतु नागरिकांनी दवाखान्यात नेल्याने त्याचे प्राण बचावले. त्याला आठ टाके टाकण्यात आले.

पोलिसांना आव्हान…
नायलॉन मांजा विक्री करण्यावर बंदी असताना गेल्या पंधरा दिवसांत गुजरातमधून शहरात मोठ्या प्रमाणात नायलॉनचा मांजा विक्रीस आला आहे. जिल्ह्यात दुकानदार छुप्या पद्धतीने या मांजाची विक्री करत आहेत. काही दुकानात तर सर्रास चकर्‍या गल्लीबोळात खोक्यात ठेवून विकल्या जात आहेत. पोलिसांनी दुकानदारांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

हेही वाचा:

The post नाशिक : मांजाने शेतकर्‍याचा गळा कापला appeared first on पुढारी.