नाशिक : माजी सैनिकाची हत्या करुन कारमध्ये जाळले, सहा महिन्यांनी खूनाचा उलगडा

www.pudhari.com

घोटी : पुढारी वृत्तसेवा

घोटीनजीकच्या आंबेवाडी शिवारात सहा महिन्यांपूर्वी वनविभागाच्या हद्दीत जळालेल्या चारचाकी कारमधील अनोळखी मृतदेहाच्या हत्येचा छडा तब्बल सहा महिन्यांनी लावत पोलिसांनी एका विधिसंघर्षित बालकासह तरुणाला अटक केली. हा मृतदेह चांदवड तालुक्यातील माजी सैनिकाचा असून वाहनाला कट मारल्याच्या क्षुल्लक कारणातून हत्या करून त्याच्याच कारमध्ये जाळल्याचे उघड झाले.

जळालेल्या चारचाकी हुंदाई सॅन्ट्रो कारच्या अवशेषावरून पोलिसांनी ही कार संदीप पुंजाराम गुंजाळ (रा. न्हनावे, ता. चांदवड) यांची असल्याची माहिती शोधून काढली. संदीप गुंजाळ हे माजी सैनिक असून ते इगतपुरीला समृद्धी महामार्ग साउथ पोल येथे सुरक्षा विभागाचे कामकाज पाहात होते. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक हेमंत पाटील यांच्या पथकाने समृद्धी महामार्गाचे कामगार, सिक्युरिटी गार्ड्स व ऑफिस स्टाफ यांच्याकडे गुंजाळ यांच्याबाबत माहिती घेतली असता ते ३० ऑगस्ट २०२२ ला मध्यरात्री कारने भावली धरण परिसराकडे गेल्याचे समजले होते. पोलिसांनी भावली धरण परिसरात चौकशी केली असता घटनेच्या दिवशी त्यांचे नांदगाव सदो येथील एका दुचाकीस्वाराशी वाहनाला कट मारल्याच्या कारणावरून भांडण झाल्याची माहिती नागरिकांकडून मिळाली. त्या आधारे नांदगाव सदो शिवारातून पोलिसांनी संशयित आकाश चंद्रकांत भोईर (२४) आणि एका विधिसंर्षित बालकाला ताब्यात घेतले. समृद्धी महामार्गाच्या पुलाखाली सर्कलजवळून नांदगाव सदो गावाकडे दुचाकीवरून जात असताना कारने आम्हास कट मारला म्हणून त्यांना आम्ही शिवीगाळ केली. कारचालक गुंजाळ यांनीही शिवीगाळ केल्याने आम्ही चॉपरने वार करून ठार मारले. त्यांना कारमध्ये टाकून भावली धरणाच्या दिशेने घाटात निर्मनुष्य ठिकाणी नेले. तिथे कारमध्ये असलेल्या डिझेल कॅनमधील डिझेल त्यांच्या अंगावर व गाडीवर ओतून देत पेटवून दिल्याची कबुली या दोघांनी पोलिसांना दिली.

पोलिस निरीक्षक हेमंत पाटील यांच्या पथकातील पोलिस हवालदार गणेश वराडे, संदीप हांडगे, भाऊसाहेब टिळे, प्रदीप बहिरम, हेमंत गिलबिले यांनी तब्बल सहा महिने परिसर पिंजून काढत सर्व धागेदोरे जुळवत दोघांना पकडले. या शोधाबद्दल पोलिस अधीक्षक शहाजी उमाप यांनी २५ हजार रुपयांचे बक्षीस पथकाला जाहीर केले.

हेही वाचा : 

The post नाशिक : माजी सैनिकाची हत्या करुन कारमध्ये जाळले, सहा महिन्यांनी खूनाचा उलगडा appeared first on पुढारी.