नाशिक : माजी सैनिकाच्या घरातून २५ तोळे सोने चोरले

दागिने चोरी

नाशिक (देवळाली कॅम्प) : पुढारी वृत्तसेवा

लहवित येथील माजी सैनिकांचे कुटुंब सांजेगाव येथे जागरण-गोंधळाच्या कार्यक्रमास गेले असल्याचा फायदा घेत चोरट्यांनी घरातून 25 तोळे सोने व एक लाख रुपये लंपास केले.

याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, लहवित येथील जनता विद्यालयामागे माजी सैनिक सुरेश मुठाळ हे कुटुंबासह वास्तव्यास आहेत. सुरेश मुठाळ लष्कारातून सेवानिवृत्त झाल्यानंतर सैनिक विभागातील डीएसी विभागात बंगळुरू येथे कार्यरत असून, ते काही दिवसांपूर्वी सुटीवर आले होते. नुकतीच सुटी संपवून ते 9 फेब्रुवारीला बंगळुरूला रवाना झाले होते. तर आई, पत्नी, दोन मुले घरीच होते. शनिवारी (दि. 11) सायंकाळी हे सर्व जण इगतपुरी तालुक्यातील सांजेगाव येथे नातेवाइकांच्या घरी जागरण-गोंधळाच्या कार्यक्रमासाठी गेले होते. रविवारी (दि. 12) सकाळी ते घरी आले असता, घराचा कडी-कोयंडा तुटलेला, तर सर्व सामान अस्ताव्यस्त पडलेले दिसले. चोरट्यांनी कपाटाचे लाॅक तोडून त्यातील 25 तोळे सोने आणि एक लाख रुपयांची रोकड चोरून नेली.

या घटनेची माहिती पोलिसपाटील संजय गायकवाड यांनी देवळाली कॅम्प पोलिस ठाण्याला दिल्यानंतर सहायक पोलिस आयुक्त अंबादास भुसारे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक कुंदन जाधव यांनी पोलिस पथकासह घटनास्थळी येऊन पाहणी केली. श्वान पथकालाही पाचारण करण्यात आले. त्याने एअर फोर्स रस्त्यापर्यंत मार्ग दाखविला.

हेही वाचा :

The post नाशिक : माजी सैनिकाच्या घरातून २५ तोळे सोने चोरले appeared first on पुढारी.