नाशिक : माझी शेती माझा सातबारा, कधी नोंदविणार पीकपेरा?

Pike www.pudhari.news

सिन्नर : संदीप भोर
महसूल आणि कृषी विभागाच्या संयुक्त विद्यमाने शेतकर्‍यांना सक्षम करण्यासाठी शासन ई-पीकपाहणी मोबाइल अ‍ॅप व्हर्जन 2.0.3 घेऊन आलेले आहे. तालुक्यात एकूण खातेदार संख्या 1,06,287 असून एकूण क्षेत्र 1,41,841.11 हे. आर आहे. तरीही खरीप हंगामासाठी गुरुवारपर्यंत (दि.22) पीकपाहणी झालेल्या खातेदारांची संख्या केवळ 5268 असून क्षेत्र 6523.25 हे. आर असल्याचे दिसून येत आहे. शेतकर्‍यांचा हा अल्प प्रतिसाद ई-पीक पाहणीतील उदासीनता दर्शवत आहे.

या पार्श्वभूमीवर शेतकर्‍यांनी आपल्या पिकाची नोंद आपल्या बांधावरूनच ई-पीक पाहणी मोबाइल अ‍ॅपमध्ये करावी. अधिक माहितीसाठी तलाठी आणि कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधण्याची गरज आहे. 1 ऑगस्ट ते 30 सप्टेंबर अशी ई-पीक पाहणीची मुदत आहे. साधारणपणे 15 ऑक्टोबरनंतर बहुतांश पिकांच्या काढणीला सुरुवात होते. नोंदणीची मुदत संपायला अवघे आठ दिवस असताना शेतकर्‍यांकडून ई-पीक पाहणी नोंदविली गेलेली नसल्याचे आश्चर्य व्यक्त होत आहे. या नोंदीअंतर्गत किमान आधारभूत किंमत योजनेंतर्गत शेतमाल विक्रीसाठी नोंदणीची सुविधा दिलेली आहे. साखर कारखान्यांना ऊस गाळप हंगामाचे अचूक नियोजन शक्य होणार आहे. ‘विकेल ते पिकेल’ या योजनेला पाठबळ मिळणार असून, महाराष्ट्रातील कृषी उत्पादनाचा जिल्हानिहाय ब्रँड तयार होणार आहे. नव्या तंत्रज्ञानाचा उपयोग करून पिकांचे अचूक नियोजन करता येणार आहे. ही नोंद केलेली नसल्यास शेतकर्‍यांना नुकसानभरपाई अथवा शासनाची मदत मिळणार नाही, असे तहसील प्रशासनाच्या वतीने नमूद करण्यात आले आहे, त्यामुळे शेतकर्‍यांनी ही बाबत गांभिर्याने घेण्याची गरज आहे.

आजमितीला जवळपास प्रत्येक शेतकर्‍याकडे अ‍ॅन्ड्रॉइड फोन आहे आणि ई-पीक पाहणीची नोंदणी प्रक्रिया सहजसुलभ आहे. त्यामुळे प्रत्येक शेतकर्‍याने तत्काळ नोंदणी करणे आवश्यक आहे. पूर्वी तलाठी पीक पाहणीसाठी बांधावर येत नाहीत, अशी ओरड होत असे. त्यामुळे शासनाने ही सोपी पद्धत उपलब्ध करून दिली आहे. – प्रशांत पाटील, तहसीलदार सिन्नर.

थेट लाभाच्या योजना अचूक राबविल्या जाणार
ई-पीक पाहणीमुळे शेतकर्‍यांच्या थेट लाभाच्या योजना आता अधिक अचूक पद्धतीने राबविता येणार आहेत. पीकविमा आणि कृषी ऑगस्ट ते पतपुरवठा अधिक सुलभ होणार आहे. विविध पिकांखालील व फळपिकांखालील नेमके क्षेत्र किती यांची अचूकता व त्यांचे विक्री व्यवस्थापन सुलभ होईल. ई-पीक पाहणीमुळे कृषी गणना सुलभ पद्धतीने व अचूकरीत्या पूर्ण करण्यात येईल. विमा योजनेत घेतलेले पीक व ई-पीक पाहणीमध्ये नोंदविलेले पीक यामध्ये तफावतीचा मुद्दा उद्भवल्यास ई-पीक पाहणीमध्ये नोंदविलेले पीक अंतिम गृहित धरले जाईल.

हेही वाचा:

The post नाशिक : माझी शेती माझा सातबारा, कधी नोंदविणार पीकपेरा? appeared first on पुढारी.