नाशिक : मानधन वाढीसाठी ‘आशां’चा एल्गार

Asha www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
कोरोना काळात केलेल्या कामांचा थकीत कोरोना प्रोत्साहन भत्ता ग्रामपंचायतीने लवकरात लवकर द्यावा, गटप्रवर्तकांचा वेतन सुसूत्रीकरणमध्ये समावेश करावा, भाऊबीज भेट लागू करावी तसेच प्राथमिक बाबींच्या मागण्यांसाठी आशा व गटप्रवर्तक यांनी जिल्हा परिषेदवर महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते आशा गटप्रवर्तक राज्य अध्यक्ष राजू देसले आणि राज्य कौन्सिल सदस्या माया घोलप यांच्या नेतृत्वाखाली शालीमार येथील बी. डी. भालेकर मैदानावर जोरदार निदर्शने केली.

आशा व गटप्रवर्तकांनी जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपिल आहेर यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले. निवेदनात म्हटल्यानुसार, ग्रामपंचायतने कोरोना काळात आशा व गटप्रवर्तकांच्या कामाची दखल घेऊन कोरोना प्रोत्साहन भत्ता आशा व गटप्रवर्तकांना देण्याचा शासनाचा निर्णय 2020 अन्वये असताना जिल्ह्यात त्याची अल्पप्रमाणात अंमलबजावणी होत आहे. वेगवेगळ्या ग्रामपंचायती 2 ते 4 महिन्यांचा भत्ता देऊन पूर्ण भत्ता देण्यास नाकारत आहे. तसेच आजही बहुसंख्य ग्रामपंचायतींनी कोरोना प्रोत्साहन भत्ता दिलेला नाही. कोरोना कामाचा थकीत प्रोत्साहन भत्ता दिवाळीपूर्वी देऊन आशा व गटप्रवर्तकांचा गौरव करावा. याशिवाय इतर कंत्राटी कर्मचार्‍यांप्रमाणे वेतन सुसूत्रीकरणमध्ये समावेश करावा. दरमहा कामाचा संपूर्ण मोबदला 10 तारखेच्या आत द्यावा. केंद्र सरकारने 2018 पासून मानधनात वाढ केलेली नसून ती त्वरित करावी, अशा विविध मागण्यांचे निवेदन दिले. यावेळी राजू देसले, माया घोलप, सुवर्णा मेतकर, सुनीता गांगुर्डे, गीतांजली काळे, अर्चना गडाख, प्रतिभा कर्डक, सारिका घेगडमल, कविता सोनवणे, अनिता हिरे, सुजाता जोगदंड, सुनंदा शिंदे, वंदना वाघ, दीपाली मुठे उपस्थित होते.

मोर्चाला परवानगी नाकारली :
कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांनी आशा व गटप्रवर्तकांना जिल्हा परिषदेवर मोर्चास परवानगी नाकारली. मोर्चाला परवानगी मिळावी यासाठी राजू देसले व पदाधिकार्‍यांनी पोलिसांशी बराच वेळ चर्चा केली. मात्र, पोलिस मोर्चा काढण्यास परवानगी न देण्यावर ठाम राहिले. त्यामुळे आशा व गटप्रवर्तकांना भालेकर मैदानावर केवळ निदर्शने करण्यावरच समाधान मानावे लागले. त्यानंतर डॉ. कपिल आहेर यांना निवेदन देण्यात आले.

हेही वाचा:

The post नाशिक : मानधन वाढीसाठी ‘आशां’चा एल्गार appeared first on पुढारी.