नाशिक : मालमत्ता कर वसुलीसाठी नव्या वर्षातही ढोल वाजणार

ढोल बजाओ मोहीम,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

महापालिकेने दीड महिन्यापूर्वी सुरू केलेल्या ढोल बजाओ मोहिमेद्वारे सुमारे १० कोटींची थकबाकी वसूल केल्यानंतर नवीन वर्षातही महापालिकेच्या कर आकारणी विभागामार्फत कर थकबाकीदारांच्या घरांसमोर ढोल बजाओ मोहीम राबवून कर वसूल केला जाणार आहे. याबाबत मनपा आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी निर्देश दिले असून, त्यानुसार ५० हजारांवरील थकबाकीदार मनपाच्या रडारवर असतील.

कोरोना महामारीनंतर थकबाकी भरण्यासाठी करदात्यांकडून प्रतिसाद न मिळाल्याने महापालिकेने अभय योजना राबविली. मात्र, या योजनेलाही करदात्यांकडून प्रतिसाद न मिळाल्याने १७ ऑक्टोबरपासून थकबाकीदारांच्या मालमत्तांसमोर ढोल बजाओ मोहीम हाती घेण्यात आली. मोहिमेच्या पहिल्या चार दिवसांतच चार कोटींचा थकीत कर वसूल झाला. मात्र, दिवाळीमध्ये महापालिकेने या मोहिमेला ब्रेक दिला होता. दिवाळीनंतर मोहीम पुन्हा सुरू करण्यात आली असून, मोहिमेसाठी ढोल पथकांना दिलेल्या १९ दिवसांच्या निर्धारित मुदतीच्या उर्वरित १५ दिवसांत जेमतेम ६ कोटी रुपये मनपा तिजोरीत जमा होऊ शकले. मोहिमेला नंतर योग्य प्रतिसाद न मिळाल्याने ही मोहीम मनपाला थांबवावी लागली. मात्र, आता आयुक्त पुलकुंडवार यांनी नव्या वर्षातही मोहीम सुरूच ठेवण्याचे निर्देश कर आकारणी विभागाला दिले आहेत. त्याप्रमाणे ५० हजारांपुढील थकबाकीदारांची यादी तयार करण्याचे आदेश आयुक्तांनी विभागीय अधिकाऱ्यांना दिले आहेत.

जप्ती वॉरंट बजावण्याचे आदेश

कर वसुलीकरता थकबाकीदारांच्या घरांसमोर ढोल बजाओ मोहीम राबविण्यात आली, तर दुसरीकडे बड्या थकबाकीदारांच्या मालमत्ता जप्त करण्यात येणार आहे. त्याप्रमाणे संबंधित बड्या थकबाकीदारांना जप्ती वॉरंट बजावण्यात येत आहे. त्याबाबत उपआयुक्त अर्चना तांबे यांनी कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. मालमत्ता जप्तीनंतर त्यांची लिलाव प्रक्रिया मनपाकडून राबविण्यात येणार आहे.

हेही वाचा :

The post नाशिक : मालमत्ता कर वसुलीसाठी नव्या वर्षातही ढोल वाजणार appeared first on पुढारी.