नाशिक : मालेगावात अवैध कारभार करणारी ‘लुटेरी गँग’

shaikh rashid www.pudhari.news

मालेगाव : पुढारी वृत्तसेवा
मालेगाव माजी महापौर शेख रशीद यांनी बुधवारी (दि.14) पत्रकार परिषद घेत मनपा आयुक्त, अपर पोलिस अधीक्षक आणि स्थानिक मंत्र्यांवर घणाघाती आरोप करीत शहरात लुटेरी गँग आलीय की काय, असा प्रश्न पडत असल्याचे वादग्रस्त वक्तव्य केले. येत्या आठवड्यात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची भेट घेऊन संबंधित अधिकार्‍यांच्या कार्यपद्धतीविषयी तक्रार करीत त्यांच्या बदलीची मागणी करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

शहरात अवैध धंदे जोरात सुरू झालेत. कुत्तागोली, एमडी अशा उत्तेजक पदार्थांची राजरोस विक्री होतेय. आयशानगर वगळता सर्वच पोलिस ठाण्यांच्या हद्दीत गेल्या तीन महिन्यांत वाढलेले अवैध धंदे पाहता कायदा व सुव्यवस्थेला धोका निर्माण झालाय. जमिनी बळकविण्याचे प्रकार घडत असताना दोषींवर कारवाई करण्याऐवजी मूळ जमीनमालकांवर गुन्हे दाखल होतात. यातून पोलिसांचीच मिलीभगत अधोरेखित होते, असा खळबळजनक आरोप शेख यांनी केला. सर्वांत वादग्रस्त आयुक्त म्हणून विद्यमान मनपा आयुक्तांवर त्यांनी निशाणा साधला. मालेगावच्या माहेरवाशिणींप्रमाणे आयुक्त आठवड्यातून एकदाच कार्यालयात येतात. सप्टेंबर उजाडूनही मनपाचे अंदाजपत्रक लागू झालेले नाही. कॅम्प मॉड्युल रुग्णालयात मानधन तत्त्वावरील 65 पदे भरताना अल्पसंख्याक उमेदवारांवर अन्याय झाला असून, आयुक्त केवळ मंत्र्यांच्या शब्दाला बांधील असल्याची टीका शेख यांनी केली. अधिनस्त अधिकार्‍यांना बिनअधिकारी करून सर्व अधिकार आपल्या हाती ठेवून अर्थपूर्ण मनमानी कारभार हाकला जात जातोय. सरतेशेवटी पोलिस अन् मनपात महिन्याला किमान दीड कोटीची वसुली होत असल्याचा दावा करीत शेख यांनी आयुक्तांच्या घरावर ईडीची कारवाई व्हायला हवी, अशी मागणीही यावेळी केली. येत्या आठवड्याभरात मनपासमोर जनआंदोलन करण्याचाही इशारा दिला आहे.

आता सेनेशी युती असंभव : माजी महापौर शेख यांनी मंत्री दादा भुसे यांच्याविषयी तीव्र नाराजी व्यक्त करताना, राष्ट्रवादी काँग्रेस आगामी निवडणुकीत मनपाच्या सर्व जागा ताकदीनिशी लढेल. बलाबल मिळेलच, युतीची वेळ आली तरी शिवसेनेशी कदापि घरोबा करणार नाही, असे त्यांनी यावेळी जाहीर केले. मंत्र्यांनी कोणतेच विकासकाम केले नसून, केवळ श्रेय लाटण्याचा प्रयत्न होतो. खराब रस्त्यांच्या कामांना केवळ पीडब्ल्यूडी जबाबदार असून, ठेकेदारांशी थेट टक्केवारीची बोलणी होते, असा धक्कादायक दावा त्यांनी केला. एकूणच बिघडलेल्या प्रशासकीय परिस्थितीबद्दल मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याकडे गार्‍हाणे मांडले जाईल, अधिकार्‍यांच्या बदलीची मागणी करू, असे शेख यांनी सांगितले.

हेही वाचा:

The post नाशिक : मालेगावात अवैध कारभार करणारी ‘लुटेरी गँग’ appeared first on पुढारी.