नाशिक : मालेगावात उद्यापासून घरोघरी देणार गोवरची लस

गोवर www.pudhari.news

नाशिक (मालेगाव) : पुढारी वृत्तसेवा
राज्यात गोवरच्या संशयित रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेण्यात येऊन आरोग्य विभागातर्फे खबरदारीच्या उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत. मालेगावातदेखील काही बालकांना गोवरचे निदान झाल्याने महापालिकेचा आरोग्य विभाग सतर्क झाला आहे. साथ नियंत्रणासाठी प्रशासक भालचंद्र गोसावी यांनी आरोग्य विभागाची बैठक घेत आढावा घेतला होता. दरम्यान, मनपा संचलित 14 नागरी आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रात येत्या 15 ते 25 डिसेंबर या कालावधीत विशेष लसीकरण मोहीम राबविली जाणार आहे. घरोघरी जाऊन बालकांना गोवरची लस दिली जाणार आहे.

या सर्वेक्षणादरम्यान महापालिकेतर्फे पात्र बालकांना ‘जीवनसत्त्व अ’चा डोस दिला जाणार आहे. तसेच सर्वेक्षणात ज्या पात्र बालकांचा गोवर रुबेलाचा डोस राहून गेला आहे, अशा बालकांची यादी तयार करुन दि. 15 ते 25 डिसेंबर या कालावधीत गोवर लसीकरणाच्या विशेष मोहिमेचे नियोजन झाले आहे. यादरम्यान पात्र बालकांनी नजीकच्या प्राथमिक नागरी आरोग्य केंद्राशी संपर्क साधून लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन प्रशासक गोसावी यांनी केले आहे. शहरातील खासगी वैद्यकीय व्यावसायिकांनी त्यांच्याकडे ताप, पुरळ इत्यादी लक्षणे असलेले गोवरसद़ृश रुग्ण आढळून आल्यास त्याची माहिती महापालिकेच्या प्राथमिक नागरी आरोग्य केंद्राकडील वैद्यकीय अधिकार्‍यांना त्वरित द्यावी. तसेच शहरातील 9 महिने ते 11 महिने वयोगटातील मुलांना गोवर रुबेलाचा पहिला डोस व 16 ते 24 महिने वयोगटातील मुलांना गोवर रुबेलाचा दुसरा डोस देण्यात यावा. जीवनसत्त्व अ चा डोस दिला नसेल तर अशा पात्र लाभार्थ्यानी महापालिकेच्या नागरी आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा, असे आवाहन आरोग्याधिकारी डॉ. सपना ठाकरे यांनी केले आहे.

हेही वाचा:

The post नाशिक : मालेगावात उद्यापासून घरोघरी देणार गोवरची लस appeared first on पुढारी.