नाशिक : मालेगावी खासदार राऊत यांच्या पुतळ्याचे दहन

मालेगाव www.pudhari.news

नाशिक (मालेगाव) : पुढारी वृत्तसेवा
खासदार संजय राऊत यांनी पालकमंत्री दादा भुसे यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप करणारे ट्वीट केल्याचे पडसाद प्रथम विधानसभेत आणि त्यानंतर लगेचच मालेगावात उमटले. शिवसेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मंगळवारी, दि.21 दुपारी 4 च्या सुमारास मोसम पूल चौकात खासदार राऊत यांचा पुतळा दहन करण्याचा प्रयत्न केला. तो प्रतिकात्मक पुतळा पोलिसांनी ताब्यात घेतला, परंतू, शिवसैनिकांनी राऊत यांच्या पोस्टरला जोडे मारत निषेध नोंदवला. या प्रकारामुळे मोसम पूल चौकात एकच गोंधळ उडून वाहतूक प्रभावित झाली होती.

मालेगावी येत्या 26 तारखेला पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे शिवगर्जना मेळावा घेणार आहेत. त्याच्या नियोजनासाठी नुकताच खासदार राऊत यांनी मालेगाव दौरा केला होता. त्यानंतर सोमवारी (दि.20) त्यांनी एक ट्वीट करत पालकमंत्री भुसे यांच्यावर निशाणा साधला होता. ज्यात गिरणा अ‍ॅग्रो कंपनीच्या नावाने कोट्यवधी रुपये लाटण्यात आल्याचा आरोप केला आहे. त्यास आक्षेप घेत पालकमंत्री भुसे यांनी विधानसभेत या प्रकरणाचा सोक्षमोक्ष करावा, सखोल चौकशी करावी, दोषी आढळल्यास राजकारणातून संन्यास घेईल, असे आव्हान त्यांनी विरोधकांना दिले होते. या घटनाक्रमानंतर शिवसेना संपर्क कार्यालयात पदाधिकारी व कार्यकर्त्यांची गर्दी जमली. तेथून सर्व मोसम पुलावर आलेत. याठिकाणी राऊत यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला पेटविण्याचा प्रयत्न केला. परंतु, तो पुतळा पोलिसांनी ताब्यात घेतला. राऊत यांच्या पोस्टरला जोडे मारत शिवसैनिकांनी रोष व्यक्त केला.

हेही वाचा:

The post नाशिक : मालेगावी खासदार राऊत यांच्या पुतळ्याचे दहन appeared first on पुढारी.