नाशिक : मालेगाव आगाराला मिळणार 10 नवीन बसेस

दादा भुसे www.pudhari.news

नाशिक (मालेगाव) : पुढारी वृत्तसेवा
मालेगाव आगाराला सोयी सुविधायुक्त 10 नवीन बसेस उपलब्ध होणार असून त्यापैकी तीन बसेस दाखलही झाल्या आहेत. मालेगाव – नाशिक मार्गावर धावणार्‍या बसेसचे शनिवारी (दि. 11) पालकमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते लोकार्पण झाले. यावेळी त्यांनी सर्वसामान्यांच्या प्रवासाचे मुख्य साधन हे लालपरीच आहे. त्या अनुषंगाने प्रवाशांना अत्याधुनिक सुविधा पुरविण्यात येऊन एसटी महामंडळाला गतवैभव प्राप्त होण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही दिली.

येथील नवीन बसस्थानकात पालकमंत्री भुसे यांनी नूतन बसेसला हिरवा झेंडा दाखवून या बसेसचे लोकार्पण केले. मालेगाव – नाशिक या मार्गावर उपलब्ध झालेल्या आरामदायक प्रवासाचा प्रवाशांनी लाभ घ्यावा, असे आवाहन पालकमंत्र्यांनी यावेळी केले. यावेळी नाशिक विभाग नियंत्रक अरुण सिया म्हणाले की, एसटी महामंडळाकडून प्रवाशांच्या सोयीसाठी बसच्या फेर्‍या वाढविण्याबरोबर प्रवाशांना आरामदायक व सुरक्षित लांबपल्ल्याचा प्रवास करण्यासाठी नवीन पद्धतीच्या बसेस उपलब्ध होणार आहेत. विभागीय वाहतूक अधिकारी किरण भोसले, दादाजी महाजन, प्रमोद पाटील उपस्थित होते.

टप्प्याटप्प्याने इलेक्ट्रिक बसेस…
कर्मचार्‍यांनी उपलब्ध होणार्‍या बसेस चांगल्या पद्धतीने वापरून शिस्तबद्ध पद्धतीने काम करावे. तसेच एसटी महामंडळाकडून प्रवाशांच्या आवश्यकतेनुसार व मागणीनुसार आतापर्यंत विविध बससेवा सुरू असून प्रवाशीही त्याचा लाभ घेत आहेत. येणार्‍या काळात नवीन बसेसची संख्या आणखी वाढेल. इलेक्ट्रिक बसेसही टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात येणार असल्याचे पालकमंत्री भुसे यावेळी सांगितले. मालेगाव बसस्थानकातील अडचणी सोडविण्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा सुरू असल्याचेही त्यांनी नमूद केले.

हेही वाचा:

The post नाशिक : मालेगाव आगाराला मिळणार 10 नवीन बसेस appeared first on पुढारी.