नाशिक : मिस्तुरा फेस्टमध्ये विविध कलागुणांचे दर्शन

मिस्तुरा फेस्ट,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

कलाकारांचे हक्काचे व्यासपीठ म्हणजे मिस्तुरा फेस्ट. स्थानिक कलाकरांना त्यांच्या विविध कलाकृती एकाच व्यासपीठावर सादर करता येतात. त्यामुळे दरवर्षी तरुणाईला मिस्तुरा फेस्टचे आकर्षण असते. शौर्य फाउंडेशनतर्फे दि. २४ व २५ डिसेंबर रोजी सुयोजित गार्डन गोदाघाट येथे हा फेस्टिव्हल आयोजित करण्यात आला होता.

या फेस्टिव्हलचे उद्घाटन आमदार प्रा. देवयानी फरांदे, मनपा आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, संदीप फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. संदीप झा, माजी नगरसेविका हिमगौरी आहेर-आडके, सुयोजितचे संचालक अनिल जैन यांच्या हस्ते करण्यात आले.

ओपन आर्ट संकल्पनेवर आधारित यंदाच्या फेस्टमध्ये विविध कला सादर करण्यात आल्या. गोदाकाठच्या थंडगार व निसर्गरम्य वातावरणात चित्र, शिल्पकृती, सेल्फी पॉइंट आणि लक्षवेधी सजावटीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. ग्रुप डान्स, सोलो डान्स, नाट्य, वादन कलेचे सादरीकरण करण्यात आले. रविवारी सुट्टी असल्याने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. फेस्टमध्ये कॅलिग्राफी, कॅनव्हास पेंटिंग, हॅण्डमेड दागिने व खाद्यपदार्थांचे स्टॉल्स उभारण्यात आले होते. नाशिकचे नामांकित कलाकार, विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या विविध कलाकृती व इन्स्टॉलेशन येथे साकारण्यात आले होते. कलाप्रेमींसाठी विविध प्रदर्शन व चित्रांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. फेस्टमध्ये यंदा प्रदर्शन उपक्रमांसोबत शंभराहून अधिक कलाकारांचे कला सादरीकरण झाले. शिवाय तरुणांचे आकर्षण असलेल्या म्युझिकल नाइट, ढोल वादन, लाइव्ह पेंटिंग, रॉक बॅण्ड, क्लासिकल आणि फोक संगीत फॅशन शो लक्षवेधी ठरले. फेस्टमध्ये कला, संस्कृती, इनोव्हेशन प्रोजेक्ट सादर करण्यात आले.

हेही वाचा :

The post नाशिक : मिस्तुरा फेस्टमध्ये विविध कलागुणांचे दर्शन appeared first on पुढारी.