नाशिक : मीच म्युनिसिपल कर्मचारी सेनेचा अध्यक्ष, तिदमेंचा दावा

प्रवीण तिदमे,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
माजी नगरसेवक तथा म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेचे अध्यक्ष प्रवीण ऊर्फ बंटी तिदमे यांनी शिवसेनेला राम राम ठोकत शिंदे गटात सहभागी झाल्यानंतर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष बबनराव घोलप यांनी तिदमे यांची हकालपट्टी केली होती. परंतु, या हकालपट्टीला काही तास होत नाही तोच तिदमे यांनी संघटनेच्या पदाधिकार्‍यांची बैठक घेत आपणच संघटनेचे अध्यक्ष असल्याचा छातीठोकपणे दावा केला आहे. यामुळे संघटनेच्या पदावरूनही आता ठाकरे आणि शिंदे गट यांच्यात वाद उभा राहणार आहे.

नाशिक मनपातील मान्यताप्राप्त संघटना म्हणून नाशिक म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेना आहे. यामुळे या संघटनेला महत्त्व असून, मनपातील ही सर्वात मोठी संघटना आहे. संघटनेचे जवळपास चार हजारांहून अधिक सदस्य आहेत. गेल्या पाच वर्षांपासून या संघटनेचे अध्यक्षपद हे माजी नगरसेवक प्रवीण तिदमे यांच्याकडेच आहे. त्यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केल्यानंतर शिंदे गटाने तिदमे यांच्यावर महानगरप्रमुखपदाची जबाबदारी सोपविली आहे. तिदमे यांच्या प्रवेशानंतर त्याच दिवशी म्युनिसिपल कर्मचारी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी मंत्री बबनराव घोलप यांनी संध्याकाळी पत्र काढत तिदमे यांची अध्यक्षपदावरून हकालपट्टी करत संघटनेचे अध्यक्ष स्वतःच असल्याचे जाहीर केले होते. त्यावर तिदमे यांनी बुधवारी (दि.21) मनपातील संघटनेच्या कार्यालयात प्रमुख पदाधिकार्‍यांची बैठक घेत आपणच संघटनेचे अध्यक्ष असल्याचे ठासून सांगितले आहे. संघटनेचे उपाध्यक्ष जीवन लासुरे, रावसाहेब रूपवते, सरचिटणीस राजेंद्र मोरे, सहचिटणीस भूषण देशमुख, खजिनदार उत्तम बिडगर, सचिव सोमनाथ कासार, मुख्यालय प्रमुख नंदकिशोर खांडरे व उपखजिनदार विशाल तांबोळी यांनी तिदमे यांच्या अध्यक्षपदावर विश्वास व्यक्त केला.

अध्यक्षपद घोलप यांच्याकडेच का?
घोलप यांनी संस्थापक अध्यक्ष या नात्याने प्रवीण तिदमे यांची अध्यक्षपदावरून हकालपट्टी केली, मात्र या पदावर अन्य कुणाची नेमणूक न करता ते स्वत:कडेच का ठेवले असा प्रश्न उपस्थित केला जात असून, त्यामागील नेमका अर्थ काय अशी चर्चा महापालिकेत तसेच राजकीय वर्तुळात सुरू आहे. तसे पाहिल्यास तिदमे हे घोलप यांचे खंदे समर्थक आहेत. त्यामुळे हा सर्व प्रकार समजून उमजून तर सुरू नाही ना अशी शंकादेखील उपस्थित केली जात आहे. संघटनेच्या प्रमुखपदावरून निष्कासित करायचे असल्यास संघटनेच्या विद्यमान पदाधिकार्‍यांची बैठक घ्यावी लागते. त्यात निर्णय घ्यावा लागतो. परंतु, घोलप यांनी एकतर्फी निर्णय घेतल्याचे तिदमे यांचे म्हणणे आहे. संघटनेने माझ्यावरच विश्वास व्यक्त केल्याने मीच संघटनेचा अध्यक्ष असल्याचा तिदमे यांनी दावा केला आहे.

हेही वाचा :

The post नाशिक : मीच म्युनिसिपल कर्मचारी सेनेचा अध्यक्ष, तिदमेंचा दावा appeared first on पुढारी.