नाशिक : मुंगसाची शिकार करणारे जेरबंद

दिंडोरी : पुढारी वृत्तसेवा 

तालुक्यातील अकराळे शिवारातील न्याहारी डोंगराच्या राखीव वन क्षेत्रात मुंगसाची शिकार करणारे मजूर जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले आहे.

याबाबतचे वृत्त असे की, दिंडोरी तालुक्यातील नाशिक कळवण रस्त्यालगत असणाऱ्या ऐतिहासिक न्याहारी डोंगराच्या पायथ्याशी वनविभागाचे राखीव वनक्षेत्र असून या परिसरात गेल्या काही दिवसापासून वन्य प्राण्यांची शिकार केली जात असल्याची माहिती स्थानिक आणि वन विभागाला मिळाली. त्यानुसार गुरुवार (दि.16) रोजी गुजरात राज्यातील पाच संशयताच्या टोळीने न्याहारी डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या वनविभागाच्या क्षेत्रात दोन मुंगसाची शिकार केली. त्यानंतर पलायन करण्याच्या तयारीत असताना स्थानिकांच्या खबरीवरून त्यांना रंगेहात पकडण्यास उमराळे वन विभागाच्या पथकाला यश आले आहे. पाच संशयित हे गुजरात राज्यातील असून शिकार करण्यास प्रतिबंध असलेल्या मुंगसाची शिकार केल्याने त्यांना वनविभागाने अटक केली. यामध्ये पंडित काशिनाथ दिवा, ऋतिक अर्जुन भोगे, तेजस कासू रिजड, संतोष अर्जुन भोगे (रा. गुजरात) या संशयित इसमाचा समावेश आहे.

उपवनसंरक्षक, सहाय्यक वन संरक्षक उमेश वावरे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी पूजा जोशी, वन परिमंडळ अधिकारी अशोक काळे, वनरक्षक योगेश दळवी, दशरथ कडाळे, श्रावण कामिडी, वन मजूर शिरसाट जाधव यांच्या पथकाने ही यशस्वी कारवाई करुन संशयितांना अटक केली. संशयित हे गुजरात राज्यातून मजुरीसाठी दिंडोरी परिसरात आले होते. वनविभागाच्या दुसऱ्या कारवाईत देहरेवाडी परिसरात जंगलात बांबूची अवैधरीत्या तोड करणारे मोहन निवृत्ती मोरे (रा. देहरेवाडी, ता. दिंडोरी) यांना ताब्यात घेत त्यांच्याकडून अवैधरित्या तोड केलेले बांबू जप्त करण्यात आले आहे.

हेही वाचा:

The post नाशिक : मुंगसाची शिकार करणारे जेरबंद appeared first on पुढारी.