नाशिक : मुख्यमंत्र्यांनी ज्योतिषाकडे सरकारचे भविष्य जाणून घेतल्याची चर्चा

सिन्नर ईशान्येश्वर दर्शन www.pudhari.news

नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क

शिर्डी साईबाबांच्या दर्शनासाठी आलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ताफा काल नाशिकच्या सिन्नरकडे वळाला.  मुख्यमंत्री  शिंदे यांनी मिरगाव येथील श्री शिवनिका संस्थानच्या श्री क्षेत्र श्री ईशान्येश्वर मंदिरास सदिच्छा भेट दिली. तसेच ईशान्येश्वराचे दर्शन घेतले. यावेळी मुख्यमंत्री केवळ दर्शनासाठी मंदिरात आले नव्हते तर त्यांनी यावेळी ज्योतिष बघितले, आपले व सरकारचे भविष्य जाणून घेतल्याची चर्चा आहे.

दुसरीकडे अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून मात्र या प्रकरणी निषेध व्यक्त करण्यात आला आहे. मुख्यमंत्र्यांनी खरोखर भविष्य जाणून घेतले असेल तर ही अत्यंत बेजाबदारपणाची कृत्य आहे. मुख्यमंत्र्यांसारख्या संविधानिक पदावर बसलेल्या व्यक्तीने असे कृत्य करणे म्हणजे समाजात चुकीचा संदेश पसरवण्यासारखं असल्याची प्रतिक्रिया महाराष्ट्र अंनिसचे राज्य कार्यवाहक कृष्णा चांदगुडे यांनी व्यक्त केली आहे. शिंदे गटाकडून मात्र ही चर्चा फेटाळण्यात आली आहे. पालकमंत्री दादा भुसे यांनी मुख्यमंत्री केवळ पूजेला गेले होते, हात दाखविण्याचा कुठलाही प्रकार झालेला नसल्याचे म्हटले आहे.

“मुख्यमंत्री आज शिर्डी दौऱ्यावर आले असतांना मिरगांव (सिन्नर) येथील एका ज्योतिषाकडे भविष्य पाहण्यासाठी गेल्याचे समजते आहे. ते खरे असल्यास ही अत्यंत बेजबाबदार कृती आहे. पुरोगामी महाराष्ट्रात संवैधानिक पदावर असलेल्या मुख्यमंत्र्यांच्या या कृतीचा जाहिर निषेध महाराष्ट्र अंनिस करत आहे. ज्योतिष हे शास्त्र नसून थोतांड आहे. कुणी ते शास्त्र असल्याचे सिद्ध केल्यास आम्ही एकवीस लाखाचे बक्षीस ठेवले आहे. मुख्यमंत्र्यांच्या या वर्तनातून चुकीचा संदेश गेला आहे”
-कृष्णा चांदगुडे,
राज्य कार्यवाह, महाराष्ट्र अंनिस.

The post नाशिक : मुख्यमंत्र्यांनी ज्योतिषाकडे सरकारचे भविष्य जाणून घेतल्याची चर्चा appeared first on पुढारी.