नाशिक : मुख्य बाजारपेठेत आजपासून वाहनांना नो एन्ट्री

वाहतूक पोलिस

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

तब्बल दोन वर्षांच्या कोराना प्रादुर्भावानंतर यंदा दिवाळी सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. अवघ्या काही दिवसांवर दीपोत्सव येऊन ठेपल्याने मुख्य बाजारापेठ सज्ज झाली आहे. विकेंडला बाजारपेठात खरेदीसाठी गर्दी हाेण्याची शक्यता असल्याने वाहतूक कोंडीचा प्रश्नही निर्माण होऊ शकतो. त्यापार्श्वभुमीवर शनिवार (दि.१४) पासून मुख्य बाजारपेठेत जाणाऱ्या सात रस्त्यांवर वाहनांना प्रवेश बंदीचे आदेश वाहतूक उपायुक्त पौर्णिमा चौगुले यांनी निर्गमित केले आहेत. २७ ऑक्टोबरपर्यंत वाहनांना नो एन्ट्री असणार आहे.

दिवाळी सणासाठी मोठ्या प्रमाणात किरकोळ विक्रेत्यांसह व्यावसायिकांनी बाजारपेठेत दुकाने थाटली आहेत. कामगारांचे वेतनासह बोनस झाल्याने खरेदीचा जोर वाढणार आहे. त्याया पार्श्वभूमीवर संभाव्य वाहतूक कोंडी टाळण्यासह सुरक्षिततेसाठी बाजारपेठेत ‘नो व्हेइकल झोन’ जाहीर करण्यात आला आहे. प्रमुख सात रस्त्यांवर वाहनांना प्रवेश बंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे खरेदीसाठी येणाऱ्या नाशिककरांना स्मार्ट सिटी अंतर्गत पार्किंग असलेल्या ठिकाणी वाहने उभी करावी लागणार आहे. त्यामध्ये गोदाघाट, गाडगे महाराज पूल, सांगली बँक सिग्नललगत, सागरमल मोदी विद्यालय (नेहरू गार्डन), कालिदास कलामंदिरासमोरील ‘पे अँड पार्क’ या वाहनतळांचा समावेश आहे.

बाजारपेठेत जाणारे सातही रस्ते पुढील बारा दिवस बंद राहणार असल्याने वाहनधारकांना पर्यायी मार्गांचा वापर करावा लागणार आहे. मालेगाव स्टँडवरुन मखमलाबाद नाका, रामवाडी, बायजाबाई छावणी, चोपडा लॉन्समार्गे गंगापूर नाका, जुन्या नाशिकमध्ये येण्या-जाण्यासाठी शालीमार, गंजमाळ सिग्नल, दूधबाजारमार्गे रहिवाशी मार्गस्थ होतील. बाजारपेठेलगतच्या रहिवाशांनीही केवळ पर्यायी मार्गानेच प्रवास करण्याचे पोलिसांनी सूचित केले आहे. वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी सरकारवाडा, भद्रकाली पोलिस ठाण्यासह वाहतूक शाखेतर्फे रविवार कारंजा, सांगली बँक सिग्नल, नेपाळी कॉर्नर, बादशाही कॉर्नर, गाडगे महाराज पुतळा आदी ठिकाणी बॅरिकेटींगसह बंदोबस्त असणार आहे.

दरम्यान, प्रवेश बंदी पोलिस सेवेतील वाहने, रुग्णवाहिका, शववाहिका, अग्निशमन दल, अत्यावश्यक आणि आपत्कालीन सेवेतील वाहनांना लागू नसेल. तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर मोटार वाहन अधिनियमांतर्गत कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे पोलीस उपायुक्त पौर्णिमा चौगुले यांनी स्पष्ट केले.

या रस्त्यावर प्रवेश मनाई (सकाळी ८ ते रात्री १०)

मालेगाव स्टँड ते रविवार कारंजाकडे जाणारी मालवाहू वाहने

दिल्ली दरवाजा ते धुमाळ पॉइंट

रोकडोबा मैदान ते साक्षी गणेश मंदिर, भद्रकाली

बादशाही कॉर्नर ते गाडगे महाराज पुतळा

नेपाळी कॉर्नर ते मेनरोडमार्गे धुमाळ पॉइंट

सांगली बँक सिग्नल ते धुमाळ पॉइंट

रविवार कारंजा ते धुमाळ पॉइंट

हेही वाचा  :

The post नाशिक : मुख्य बाजारपेठेत आजपासून वाहनांना नो एन्ट्री appeared first on पुढारी.