नाशिक : मुसळधार पावसामुळे सातपूरकरांची दाणादाण(फोटो)

सातपूर पाऊस,www.pudhari.news
सातपूर (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा
नाशिक शहरासह सातपूर औद्योगिक वसाहती मध्ये गेल्या पाच दिवसांपासून संततधार पाऊस सुरु आहे. (काल दि. १०) सायंकाळी व रात्री पडलेल्या मुसळधार पावसाने सातपूरकरांची दाणादाण उडाली. मुसळधार पावसामुळे सातपूर- अंबड औद्योगिक वसाहती मध्ये जाणाऱ्या कामगारांचे चांगलेच हाल झाले.  नाशिक – त्र्यंबकरोड वरील श्रीराम सर्कल ते महिंद्रा सर्कल पर्यंत दुभाजकाच्या एका बाजूला पाणी साचले होते. रस्त्याला तलावाचे स्वरूप आले होते. पाण्यामध्ये दुचाकी व चारचाकी वाहने अडकून पडली होती. मनपाची सिटीलिंक बस देखील बंद पडली होती. यामुळे तब्बल दोन तास वाहतूक ठप्प होती.

(सर्व छायाचित्र : सागर आनप)

आज सोमवार (दि. 11) सकाळी मनपाच्या बांधकाम विभागाने जेसीबी च्या साहाय्याने दुभाजक फोडून पाणी वाहण्यासाठी जागा केली. कामगार कामावर वेळेत जायचे असल्याने अशा स्थितीत देखील जीवमुठीत घेऊन मार्ग काढत होते. सातपूर औद्योगिक वसाहती मधील माळी कॉलनी, आयटीआय कॉलनी, श्रमिक नगर संत कबीर नगर, कामगार नगर, स्वारबाबा नगर, आदी व इतर भागात घरामध्ये पावसाचे पाणी शिरले. ड्रेनेज उफाळून आल्याने दूषित पाणी देखील रस्त्यावरून वाहत होते. सातपूर औद्योगिक वसाहती मधील काही कंपन्यांमध्ये देखील पाणी घुसले.
नंदिनी नदीला देखील मुसळधार पाऊसामुळे पूर आला होता. पुराचे पाणी नदी पात्र लगत असलेल्या घरामध्ये शिरले होते. यंदाच्या मोसमातील पहिला पूर पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती.
श्रमिकनगर येथील आय. टी. आय कॉलनी परिसरातील रस्त्यावर सकाळी १०:०० वाजण्याच्या सुमारास गुलमोहरचे जुने झाड कोसळले. या झाडाखालील घराचे मोठे नुकसान झाले. त्यात शिवराम लबडे हे जेष्ठ नागरिक जखमी झाले. झाड कोसळल्याने रस्त्यावरील वाहतूक काही काळ विस्कळित झाली होती ; मात्र महानगर पालिका कर्मचाऱ्यांनी या झाडाच्या फांद्या तोडून मार्ग वाहतुकीस मोकळा केला. सकाळची वेळ असल्याने नागरिकांसह वाहनांची रहदारी कमी असल्याने मोठी जीवितहानी टळली.
नाशिक महानगरपालिकेच्या माजी नगरसेविका लता पाटील यांनी या ठिकानी प्रत्यक्ष  भेट दिली.  अग्निशामक दलाशी संपर्क साधून कामाचे निवारण केले. राधाकृष्णनगर येथील भैरवनाथ अपार्टमेंट वरील घरावर देखील झाडाची मोठी फांदी पडली होती. सातपूर विभागात नव्याने बांधण्यात आलेल्या रस्त्यांना पहिल्या पावसातच खड्डे पडले. त्यामुळे निकृष्ट दर्जाचे काम उघडकीस आले आहे.

हेही वाचा :

The post नाशिक : मुसळधार पावसामुळे सातपूरकरांची दाणादाण(फोटो) appeared first on पुढारी.