नाशिक : मेनरोडला अतिक्रमण निर्मूलनाचे सोपस्कार, पथक माघारी फिरताच जैसे थे

अतिक्रमण निर्मूलन मोहीम नाशिक मनपा,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
दिवाळीचा फीव्हर संपुष्टात येताच महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने मंगळवारी (दि. 1) शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या रविवार कारंजा व मेनरोड परिसरात अतिक्रमण मोहीम राबविली. मात्र, पथकाची पाठ फिरताच परिस्थिती पूर्ववत झाल्याने ही मोहीम केवळ सोपस्कार ठरली.

महापालिकेच्या पथकाने रविवार कारंजा येथून कारवाईला सुरुवात केली. त्यानंतर या पथकाने बोहरपट्टी व मेनरोड परिसरात अतिक्रमणांवर कारवाईचा बडगा उगारला. परंतु, परिसरात सकाळपासून कारवाईची कुणकुण लागली होती. त्यामुळे रस्त्यावरील दोन-चार छोटे-मोठे विक्रेते वगळता पथकाच्या हाती काही लागले नाही. या सर्व प्रकारात पथक मार्गस्थ होईपर्यंत परिसरातील रस्त्यांनी मोकळा श्वास घेतला. पथकाची पाठ फिरताच व्यापारी, विक्रेत्यांनी पहिल्याप्रमाणे रस्त्यांवर अतिक्रमण केल्याने ही कारवाई निव्वळ फार्स ठरली आहे.

दिवाळीमुळे गेल्या पंधरा दिवसांपासून रविवार कारंजा व मेनरोड परिसरात मोठ्या प्रमाणात व्यापारी व विक्रेत्यांनी अतिक्रमण केलेे. या भागातील रस्त्यांमध्येच दुकाने थाटल्याने वाहतुकीस खोळंबा निर्माण झाला. दिवाळीचा फीव्हर संपुष्टात आल्यानंतरदेखील या विक्रेत्यांनी अतिक्रमण ‘जैसे थे’च ठेवले. त्यामुळे या अतिक्रमणावर तातडीने कारवाईची मागणी होत होती. त्यानुसार मनपाचे पथक मंगळवारी (दि.1) या भागात पोहोचले. मात्र, पथक येण्यापूर्वीच परिसरातील व्यापारी व विक्रेत्यांना कारवाईची वर्दी मिळाल्याने ते कारवाईतून सुटले. तर रस्त्यावरील छोट्या व्यावसायिकांवर कारवाईचा बडगा उगारत मोठ्या आवेशात पथक मार्गस्थ झाले. मात्र, पथकाची पाठ फिरताच व्यापार्‍यांनी पुन्हा अतिक्रमण केले. त्यामुळे मनपाच्या या वरवरच्या कारवाईविरोधात शहरवासीयांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.

हेही वाचा  :

The post नाशिक : मेनरोडला अतिक्रमण निर्मूलनाचे सोपस्कार, पथक माघारी फिरताच जैसे थे appeared first on पुढारी.