नाशिक : मॉडेल रोडचे फेरसर्वेक्षण ; अधिकार्‍यांकडून 800 कोटींचा अंदाज, आयुक्त म्हणाले…

रोड

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
शहरातील सर्वच भागांत मॉडेल रोड उभारण्यात येणार असून, त्यासाठी आयुक्त रमेश पवार यांनी विभागीय अधिकार्‍यांना मॉडेल रोडसाठी सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार अधिकार्‍यांनी अहवाल सादर केला, मात्र तो 800 कोटींपर्यंत जात असल्याने आयुक्तांनी अधिकार्‍यांना हात आखडता घेत 350 ते 400 कोटींपर्यंतचे फेरप्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले.

शहरातील बहुतांश रस्ते काँक्रिटीकरण, भूमिगत तारा तसेच सर्व प्रकारच्या युटीलिटींना जोडणारे रस्ते असावेत, या उद्देशाने मॉडेल रोड तयार करण्यात येणार आहे. प्रायोगिक तत्त्वावर प्रत्येक विभागात दोन याप्रमाणे सुरुवातीला 12 रस्ते तयार करण्यात येणार आहेत. त्यादृष्टीने आयुक्त पवार यांनी विभागीय अधिकारी तसेच बांधकाम विभागाला सर्वेक्षणाची सूचना केली होती. परंतु, कुणावर अन्याय नको आणि दुजाभाव दिसू नये, या अनुषंगाने आयुक्तांनी प्रत्येक प्रभागातील किमान एका रोडचा प्रस्ताव मॉडेल रोडकरता सादर करण्यास सांगितले होते. त्यानुसार अधिकार्‍यांनी अहवाल सादर केला. मात्र, त्यासाठी 700 ते 800 कोटींच्या निधीची गरज भासणार असल्याने आयुक्तांनी 350 ते 400 कोटींपर्यंतचे फेरप्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले.

महापालिकेची आर्थिक स्थिती आधीच बेताची आहे. त्यात जवळपास 2,300 कोटींचे दायित्व असल्याने ते कमीकरण्याकरता प्रयत्न केले जात आहे. त्यात 800 कोटींचा निधी मॉडेल रोडकरताच वापरला तर इतर कामांचे काय असा प्रश्न उपस्थित झाल्यानेच आयुक्तांनी मॉडेल रोडसंदर्भात 400 कोटींपर्यंतचे बजेट सादर करण्यास सांगितले आहे. मॉडेल रोडअंतर्गत संबंधित रोड काँक्रीट असेल. दोन्ही बाजूला फुटपाथ असतील. वीज, पाणीपुरवठा यासह इतरही प्रकारच्या केबल्स तसेच वाहिन्या टाकण्यासाठी युटिलिटी डक्स तयार करण्यात येणार आहेत. जेणेकरून वारंवार रस्ते फोडण्याची गरज पडणार नाही.

हेही वाचा :

The post नाशिक : मॉडेल रोडचे फेरसर्वेक्षण ; अधिकार्‍यांकडून 800 कोटींचा अंदाज, आयुक्त म्हणाले... appeared first on पुढारी.