नाशिक : मॉडेल स्कूलमध्ये आता टॅबलेट्स, योगा आणि मेडिटेशन

मॉडेल स्कूल www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

पालकमंत्री दादा भुसे यांच्या संकल्पनेतून जिल्हाभरात 100 मॉडेल स्कूल केले जाणार आहेत. त्यासाठी नुकतेच या शाळांमधील शिक्षकांनी आपले प्रशिक्षण पूर्ण केले आहे. या प्रशिक्षणात शिक्षकांना मेडिटेशन आणि योगाचे धडे शिकविण्यात आल्यानंतर आता जिल्ह्यातील १०० मॉडेल स्कूलमध्ये विद्यार्थ्यांना योगाचे धडे देण्यात येणार आहे. विपश्यनेच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर आधारित मेडिटेशनदेखील पूर्णपणे शिकविले जाणार आहे. याशिवाय १००० विद्यार्थ्यांना टॅबलेट्स देण्यात येणार आहे. त्यासाठी निविदा प्रक्रिया राबविली जाणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी दिली.

दरम्यान, खासगी शाळांच्या धर्तीवर या शाळांमध्ये सुविधांसह गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, प्राथमिक शिक्षणाधिकारी भगवान फुलारी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील 100 मॉडेल स्कूलची निवड करण्यात आली आहे. या शाळांमध्ये निर्माण करावयाच्या सुविधांबाबत नियोजन सुरू असतानाच नाशिक पदवीधरची आचारसंहिता लागू झाल्याने नियोजन तूर्तास जरी थांबले असले तरीदेखील विद्यार्थ्यांना शिकविण्यास सुरुवात झाली आहे. निवडलेल्या शाळांमधील शिक्षकांना पाच दिवसांचे 100 शिक्षकांना 9 ते 14 जानेवारीदरम्यान प्रशिक्षण देण्यात आलेले आहे. प्रशिक्षण दिलेल्या शिक्षकांना शाळांमध्ये जाऊन शिक्षकांशी चर्चा संवाद साधून इतर शिक्षकांना प्रशिक्षण देण्याचे काम सुरू आहे. यापुढे आता, या स्कूलमधील इतर शिक्षकांना दुस-या टप्प्यात प्रशिक्षण दिले जाणार आहे. आचारसंहिता संपुष्टात आल्यानंतर, शिक्षकांना प्रशिक्षण दिले जाईल.

नवोदय अभ्यासक्रमाचा समावेश
मॉडेल स्कूलमध्ये नवोदय अभ्यासक्रमाचा समावेश करण्यात येऊन या शाळांमधील विद्यार्थी नवोदय या राष्ट्रीय स्तरावरील परीक्षेस पात्र होऊन कसे पास होतील याकडे लक्ष दिले जाणार आहे.

हेही वाचा:

The post नाशिक : मॉडेल स्कूलमध्ये आता टॅबलेट्स, योगा आणि मेडिटेशन appeared first on पुढारी.