नाशिक : मोफत अंत्यसंस्कार योजना बंद करू नये, माजी सभागृह नेत्यांची मागणी

मोफत अंत्यसंस्कार योजना,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

महापालिकेने गेल्या २० वर्षांपासून सुरू केलेली मोफत अंत्यसंस्कार योजना बंद करू नये, अशी मागणी मनपाचे माजी सभागृहनेते दिनकर पाटील यांनी मनपा आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्याकडे निवदनाद्वारे केली आहे.

योजना २००३ पासून भाजप नेते तथा मनपाचे माजी स्थायी समिती सभापती विजय साने यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आली आहे. योजनेसाठी दरवर्षी अंदाजपत्रकात आर्थिक तरतूद करण्यात येते. परंतु, आता २० वर्षांपासून सुरू असलेली योजना मनपा प्रशासन बंद करण्याच्या तयारीत असल्याचे दिसून येते. जनसामान्य नागरिकांमध्ये योजनेविषयी व्यापक स्वरूपात प्रचार व प्रसार करण्याची गरज आहे. नाशिक शहरातील कथडा स्मशानभूमी वगळता सहाही विभागांतील इतर स्मशानभूमीत डिझेल, गॅस व विद्युत दाहिनी नाही. पंचवटी अमरधाममध्ये अंत्यसंस्कारासाठी मोठ्या प्रमाणात संख्या असल्याने तेथे अशा स्वरूपाची व्यवस्था करण्याची सूचना पाटील यांनी केली.

मोफत अंत्यसंस्कार योजना ही सामाजिक दायित्वातून सुरू ठेवणे हा उद्देश होता. परंतु, कालांतराने या योजनेकडे प्रशासनाने गांभीर्यपूर्वक लक्ष दिले नाही. स्मशानभूमीतील प्रबोधन व देणगी सूचना फलकाची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे त्याकडे देणगीदारांचे लक्ष जात नाही. स्मशानभूमीत प्रबोधनपर सूचना फलक लावण्यासाठी बांधकाम विभागाकडे निधी वर्ग झालेला आहे. असे असताना काम झालेले नसल्याची बाबही पाटील यांनी आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिली.

हेही वाचा :

The post नाशिक : मोफत अंत्यसंस्कार योजना बंद करू नये, माजी सभागृह नेत्यांची मागणी appeared first on पुढारी.