नाशिक : मोर्चेकरी अडून बसल्याने पोलिसांचा लाठीमार

पोलीसांचा लाठीमार www.pudhari.news

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा
पाथर्डी फाटा येथे अचानक आलेले मोर्चेकरी…पोलिस रोखतात.. तरीही मोर्चा काढण्याचा हट्ट सुरूच… जमाव ऐकत नसल्याने पोलिसांचा लाठीचार्ज… अश्रूधुराच्या नळ्या फोडल्या जातात… मोर्चेकर्‍यांची पळापळ… परिसरातील नागरिकांमध्ये घबराट…पण हे मॉकड्रिल असल्याचे समजताच नागरिकांनीही सोडला सुटकेचा निःश्वास.

गणेशोत्सव व सणासुदीच्या अनुषंगाने पोलिसांना कोणत्याही परिस्थितीला तोंड देता यावे, यासाठी विविध परिस्थितींशी मिळत्याजुळत्या अशा मॉकड्रिलच्या माध्यमातून पोलिस दलाचा सराव सुरू करण्यात आलेला आहे. परिस्थिती तत्काळ नियंत्रणात आणणे पोलिसांची अतिशय महत्त्वाची जबाबदारी असते. नेमका हुबेहूब प्रसंग उभा करत पोलिसांना फिल्डवर परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी शिकविले जात आहे. याचाच भाग म्हणून पाथर्डी फाटा भागात आज नागरिकांना मॉकड्रिल पाहायला मिळाले. अंबड पोलिस ठाणे हद्दीत सहायक पोलिस आयुक्त सोहेल शेख यांच्या मार्गदर्शनाखाली पाथर्डी फाटा येथे वरिष्ठ पोलिस निरीक्षक भागीरथ देशमुख यांनी दंगा नियंत्रण योजना रंगीत तालीम घेतली. त्याकरिता अंबड पोलिस ठाण्याचे तीन पोलिस निरीक्षक, चार सहायक पोलिस निरीक्षक, 46 अंमलदार, पाच महिला अंमलदार, वीस पुरुष होमगार्ड व दहा महिला होमगार्ड तसेच इंदिरानगर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संजय बांबळे, अंमलदार तसेच सातपूर येथील पोलिस निरीक्षक घोटेकर व त्यांचे अंमलदार आणि आरसीपीची तुकडी सहभागी झाली होती. पाथर्डी फाटा येथे विविध मागण्यांच्या घोषणा देणार्‍या जमावास पोलिस समजावून सांगत होते. हा मोर्चा बेकायदेशीर असून, अशी कृत्ये करू नका, असे आवाहन पोलिस करत होते. मात्र, जमाव ऐकत नसल्याने पोलिसांनी लाठीचार्ज केला, अश्रूधूर सोडला. तरीही जमाव शांत होत नसल्याचे पाहून पोलिसांचा लाठीमार केला अन् काही जखमींना तातडीने रुग्णालयात नेले. हा सारा प्रकार पाहून काही काळ नागरिकही भांबावले. परंतु हे मॉकड्रिल असल्याचे समजताच नागरिकांनीही सुटकेचा निःश्वास सोडला.

हेही वाचा:

The post नाशिक : मोर्चेकरी अडून बसल्याने पोलिसांचा लाठीमार appeared first on पुढारी.