नाशिक : …म्हणून अंगणवाडीसेविकांना देणार नवीन मोबाइल

अंगणवाडी सेविकांना मोबाईल देणार,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

अंगणवाडीचे काम ऑनलाइन करण्यासाठी प्रत्येक सेविकेला ऑनलाइन माहिती भरण्यासाठी महिला व बालकल्याण विभागाकडून नवीन मोबाइल देण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. विभागाने दोन वर्षांपूर्वी मिळालेल्या मोबाइलची सद्यस्थिती काय आहे, याबाबत माहिती मागविली आहे.

जिल्ह्यात चार हजार 776 अंगणवाड्या, तर 506 मिनी अंगणवाड्या आहेत. येथील सुमारे पाच हजार 200 अंगणवाडी सेविकांना मोबाइलची आवश्यकता भासते. महिला व बालकल्याण विभागामार्फत चालविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती ‘पोषण ट्रॅकर’ या ॲपद्वारे ऑनलाइन भरली जाते. त्यासाठी अंगणवाडी सेविकांना मोबाइलची आवश्यकता आहे.

सर्व अंगणवाड्यांचे कामकाज ऑनलाइन करण्याचा निर्णय राज्य सरकारने दोन वर्षांपूर्वी घेतला होता. त्यासाठी प्रत्येक सेविकेला मोबाइल तसेच सेविकांना प्रशिक्षणही देण्यात आले होते. प्रत्येक सेविका मोबाइलमध्ये कॉमन ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर (कास) या ॲपद्वारे माहिती भरत होती. मात्र, मिळालेले मोबाइल निकृष्ट दर्जाचे असल्याचे सांगत या अंगणवाडी सेविकांनी मध्यंतरी आंदोलन करत शासनाकडे मोबाइल परत करण्याचा निर्णय घेतला होता. आता या सेविकांना नवीन मोबाइल देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यादृष्टीने त्यांनी जिल्हास्तरावरील माहिती मागविली आहे.

नोंदी होणार अपडेट

अंगणवाडीतील पूरक पोषण आहार, औषधांचे वाटप, बालकांच्या वजन, उंचीच्या नोंदी, लसीकरण आदींच्या नोंदी घेण्यात येतात. मोबाइल मिळाल्यास अंगणवाडी सेविकांना रजिस्टर हाताने लिहिण्याची गरज राहणार नाही.

The post नाशिक : ...म्हणून अंगणवाडीसेविकांना देणार नवीन मोबाइल appeared first on पुढारी.