नाशिक : म्हसरूळ शिवारातील ‘त्या’ नराधमावर पाच गुन्हे दाखल

म्हसरूळ नराधम www.pudhari.news

नाशिक (पंचवटी)  : पुढारी वृत्तसेवा

“द किंग फाउंडेशन” संस्थेच्या ज्ञानदीप गुरुकुल खासगी वसतीगृहात २०१८ ते २०१९ पासून संशयित हर्षल बाळकृष्ण मोरे (३२) याने अनेक मुलींचा विनयभंग तसेच त्यांच्यावर वेगवेगळ्या बहाण्याने व वेगवेगळ्या प्रकारे अत्याचार व अपकृत्य केल्याचे विद्यार्थिनींच्या चौकशीतून समोर आले असून यात चार अल्पवयीन तर एक सज्ञान मुलींकडून बलात्कार, बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम (पोक्सो), अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियम (ॲट्रॉसिटी) असे वेगवेगळे पाच गुन्हे पोलिसांनी दाखल केले आहे.

म्हसरूळ शिवारातील ज्ञानदीप गुरुकुल खासगी वसतीगृहात चौदा वर्षांच्या मुलीवर संशयित संस्थाचालक हर्षल मोरे याने अश्लील व्हिडिओ दाखवून बलात्कार केला. याप्रकरणी पोलिसांनी अन्य मुलींचेही जाबजबाब नोंदविले असुन यात अनेक धक्कादायक प्रकार उघड झाले आहे. मोरे याने मुलींना मध्यरात्री हातपाय दाबायला बोलावून हे प्रकार करत असल्याचे आढळले आहे. तसेच इतर मुलींवर देखील अत्याचार झाल्याचे समोर येत आहे. आरोपी हर्षल मोरे याने मुलींना आश्रमातून काढून टाकण्याची धमकी देत अत्याचार केल्याची पुढे आले आहे. नववीच्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या मुलीवर मोरे याने बलात्कार केल्याची घटना घडल्यानंतर तिने जवळच्या नातेवाइकांकडे याबाबत माहिती दिली होती. त्यानंतर त्याच्यावर गुन्हा दाखल झाला असून सध्या मोरेची रवानगी कारागृहात करण्यात आली आहे. खासगी वसतीगृहातील मुली मोरेच्या हात पाय दाबण्याच्या प्रकाराचे एकमेकांना विचारणा करायच्या. मात्र आश्रमातून काढून टाकण्याची भीतीने पीडितांपैकी कोणीही तक्रार करण्यासाठी पुढे येत नसे. तसेच मुलींवर गेल्या अनेक वर्षांपासून अत्याचार होत असल्याची बाब देखील पुढे आली आहे. पीडित पाचही मुलींची वैद्यकिय तपासणीही करण्यात आली असून त्यांचे अहवाल शनिवारपर्यंत पोलिसांना प्राप्त झालेले नव्हते.

संबंधितांचेही नोंदविला जबाब…

म्हसरूळ पोलिसांनी पीडित मुलीसह अन्य मुलींचे तसेच त्यांच्या पालकांचे जबाब नोंदविण्याचे काम पूर्ण केले आहे. ज्या रो-हाऊसमध्ये ज्ञानदीप गुरुकुल खासगी वसतीगृहात चालविला जात होता. त्या घरमालकाचाही जबाब नोंदवून घेतला आहे. हा घरमालक मुंबईचा रहिवासी असल्याचे पोलिसांनी सांगितले.

कुटुंबीयांची गैरसोय…

घटना घडल्यानंतर सर्वच मुलींच्या पालकांना पोलिसांनी जबाब नोंदविण्यासाठी पोलीस ठाण्यात बोलावून घेतले आहे. यामुळे २० ते २५ महिला, पुरुष पोलीस ठाण्यात मागील तीन दिवसांपासून बसून आहेत. पीडित कुटुंबातील सदस्यांना राहण्याची व भोजनाची देखील सोय अद्याप कोणाकडून करण्यात आलेली नाही. त्यामुळे त्यांची गैरसोय होत असल्याचा आरोप काही आदिवासी संघटनांनी केला आहे.

खासगी वसतीगृहातील सर्व मुलींची खोलवर चौकशी केली असता काही मुलींबरोबर अपकृत्य झाल्याचे समोर आले आहे. त्याबाबत आरोपीवर वेगवेगळ्या प्रकारचे पाच गुन्हे दाखल करण्यात आले असुन सखोल तपास सुरू आहे. – किरणकुमार चव्हाण, पोलीस उपायुक्त, परिमंडळ १.

हेही वाचा:

The post नाशिक : म्हसरूळ शिवारातील 'त्या' नराधमावर पाच गुन्हे दाखल appeared first on पुढारी.